Categories: Featured

पुलवामा हल्ल्याचे पुणे कनेक्शन, चाकण परिसरातून एकास अटक

पुणे (२८ मार्च) : पुलवामा हल्ल्यात पुणे कनेक्शन असल्याचे उघड झाले आहे. या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी पुण्यातील चाकण परिसरातून एकाला अटक करण्यात आली आहे. जवानांच्या पोस्टिंग डिटेल्सची प्रिंट जवळ बाळगणाऱ्या संशयित दहशतवाद्यांच्या साथीदारांच्या यादीत ही व्यक्ती सामील असून, बिहार एटीएसने त्याला अटक केली आहे.

शरियत मंडल असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. काही दिवसांपूर्वी बिहारमधून एटीएसने दोघा दहशतवाद्यांना अटक केली होती. बिहारमधून अटक केलेले खैरुल मंडल आणि अबू सुलतान हे दोघेही बांगलादेशी आहे, तर शरियत हा भारतीय आहे. शरियत पुण्यातील चाकणमध्ये राहत होता.

खैरुल मंडल आणि अबू सुलतान यांची बिहार एटीएसने चौकशी केली असता त्यातून शरियतची माहिती समोर आली. त्यानंतर बिहार एटीएसने पुणे एटीएसच्या मदतीने शरियतला अटक केली असून त्याला चौकशीसाठी बिहारला नेण्यात आले आहे.

बिहारमधून अटक केलेले खैरुल मंडल आणि अबू सुलतान हे इस्लामिक स्टेट बांगलादेश आणि आयसिस सह जमात-उल-मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचे सक्रीय सदस्य आहेत. तर शरियत चाकणमध्ये बांधकाम मजूर म्हणून काम करत होता. तो खैरुल आणि अबू सुलतानच्या संपर्कात असल्याची माहिती प्राथमिक चौकशीत समोर आली आहे. 

पुलवामा हल्ल्यात ४० जवान शहीद

पुलवामा येथे १४ फेब्रुवारीला झालेल्या हल्ल्यात सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले होते. सीआरपीएफच्या जवानांच्या ताफ्यालाच निशाणा बनवून आरडीएक्सच्या सहाय्याने हा ताफा उडवण्यात आला होता. देशाच्या इतिहासातील लष्करावर झालेला हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला होता.

तब्बल २०० किलो स्फोटकांनी भरलेली कार दहशतवाद्यांनी जवानांच्या बसवर आदळवून स्फोट घडवून आणला होता. या स्फोटात बसचा अक्षरश: चुराडा झाला, तर ४० जवान शहीद झाले. या हल्ल्याची जबाबदारी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने स्वीकारली होती. त्यांनतर भारताने या हल्ल्याला जबाबदार असणाऱ्या जैश ए मोहम्मद च्या तळांवर पाकिस्तानात जाऊन हवाई हल्ला केला. यात ३०० दहशतवादी ठार झाल्याचे समोर आले होते. 

Team Lokshahi News