Categories: बातम्या राजकीय

… यासाठी घेतली फडणवीस यांची भेट; संजय राऊतांनी केला खुलासा!

मुंबई | विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या भेटीनंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्याने शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आम्ही वैयक्तिक शत्रू नाही, फडणवीसांसोबत गुप्त बैठक नव्हती, तर ‘सामना’साठी मुलाखत घेण्याबाबत चर्चा करण्यासाठी ही भेट घेतल्याचे, राऊत यांनी सांगितले. संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांची २६ सप्टेंबरला मुंबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये भेट झाली होती. 

संजय राऊत यांनी फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर राज्यातील राजकारणात खळबळ उडाली होती. सुरुवातीला दोन्ही पक्षांनी अशी कोणतीही भेट झाली नसल्याचं म्हटलं होतं. मात्र, नंतर स्वतः संजय राऊत यांनीच या भेटीची कबुली दिली. “मला ‘सामना’साठी देवेंद्र फडणवीस यांची प्रदीर्घ मुलाखत घ्यायची आहे. महाराष्ट्रातील प्रमुख साहित्यविषयक संस्थांचीही इच्छा आहे, की मी संपादक म्हणून फडणवीसांची जाहीर मुलाखत करावी. तसेही “शिवसेनेत गुप्त बैठक करण्याची पद्धत नाही. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे विरोधीपक्ष नेते आहेत, माजी मुख्यमंत्री आहेत आणि भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. ती काही भूमिगत बैठक नव्हती, आम्ही बंकर किंवा तळागारामध्ये भेटलो नव्हतो. केवळ सामनातील मुलाखतीसंदर्भात चर्चा केली, एकत्र जेवलो, अगदी गोपनीय पद्धतीने जेवलो” असा टोला मात्र राऊतांनी यावेळी लगावला. 

“सध्या जी व्यवस्था आहे, ती पाच वर्षांसाठी आहे. राज्याचे नेतृत्व उद्धव ठाकरे योग्य प्रकारे सांभाळत आहेत. शरद पवार त्यांना योग्य मार्गदर्शन करत आहेत. सोनिया गांधी यांचे मार्गदर्शन आहे.” असं म्हणत सरकार पडण्याची शक्यता संजय राऊत यांनी यावेळी फेटाळून लावली.

Team Lokshahi News