नवी दिल्ली | देशात रोजगार देण्याच्या दिशेने केंद्र एक मोठे पाऊल उचलणार आहे. मंगळवारी पंतप्रधान कार्यालयाच्या वतीने ट्विट करून मोदी सरकार येत्या दीड वर्षात 10 लाख नोकऱ्या देणार असल्याचे सांगण्यात आले. केंद्र सरकारच्या विविध विभाग आणि मंत्रालयांतर्गत ही भरती होणार आहे. सरकारच्या या पाऊलामुळे देशातील करोडो तरुणांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व विभाग आणि मंत्रालयांमधील कर्मचाऱ्यांच्या स्थितीचा आढावा घेतल्यानंतर या नोकऱ्या देण्याचे आदेश दिले आहेत.

पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, सर्व सरकारी विभाग आणि मंत्रालयांमधील मानवी संसाधनांच्या स्थितीचा आढावा घेतल्यानंतर पंतप्रधानांचे निर्देश आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व विभाग आणि मंत्रालयांमधील मानव संसाधनांच्या स्थितीचा आढावा घेतला आणि सरकारकडून मिशन मोडमध्ये 10 लाख लोकांची भरती पुढील 1.5 वर्षांत करण्याचे निर्देश दिले. पंतप्रधान मोदींनी केलेली घोषणा पीएमओने त्यांच्या ट्विटर हँडलवर शेअर केली.

मोदी सरकारचा हा निर्णय रोजगार शोधणाऱ्या तरुणांसाठी आनंद देणारा आहे. गेल्या काही दिवसांत पाटणा, अलाहाबाद सारख्या शहरांमध्ये तरुणांनी रेल्वे भरतीसाठी निदर्शने केली आहेत. मोदी सरकारवर हल्लाबोल करत अनेकदा ते रोजगार देऊ शकले नसल्याचा आरोप केला आहे. विशेषत: नोटाबंदी, जीएसटी आणि नंतर करोना या काळात अर्थव्यवस्थेचा विकास दर मंदावल्यामुळे खासगी क्षेत्रातील नोकऱ्यांच्या संधी फारशा आलेल्या नाहीत. अशा परिस्थितीत मोदी सरकारची ही घोषणा सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी महत्त्वाची ठरणार आहे.