Categories: शिक्षण/करिअर

१२ वी चा निकाल पहा दुपारी १ वाजता ‘या’ संकेतस्थळांवर..!

कोल्हापूर | महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२० मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता १२वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या www.mahresult.nic.inwww.hscresult.mkcl.org, www.maharashtraeducation.com,  या अधिकृत संकेतस्थळावर उद्या गुरुवार दि. १६ जुलै रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्य मंडळाचे सचिव अशोक भोसले यांनी आज दिली. 

ऑनलाईन निकालानंतर दुसऱ्या दिवसापासून उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेस प्रविष्ठ झालेल्या विद्यार्थ्यास स्वत:च्या अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयांव्यतिरिक्त) कोणत्याही विशिष्ट विषयात त्या त्यांने संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रत, पुनर्मूल्यांकन व स्थलांतर प्रमाणपत्रासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पध्दतीने मंडळाच्या http://verification.mh-hsc.ac.in  या संकेतस्थळावर स्वत: किंवा शाळा/कनिष्ठ महाविद्यालयामार्फत अर्ज करण्याची सोय परीक्षेपासून उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. अटी/शर्ती व सूचना संकेतस्थळावर देण्यात आलेल्या आहेत. गुणपडताळणीसाठी दिनांक १७ ते २७ जुलै २०२० पर्यंत व छायाप्रतीसाठी १७ जुलै ते ५ ऑगस्ट पर्यंत ऑनलाईन अर्ज करावा. ऑनलाईन पध्दतीने शुल्क Debit Card/Credit Card/UPI/Net Banking द्वारे भरावे. 

फेब्रुवारी-मार्च २०२० परीक्षेच्या उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य आहे. छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून कार्यालयीन कामाच्या पाच दिवसांत पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपध्दतीचा अवलंब करुन विहित नमुन्यात विहित शुल्क भरुन संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करावयाचे असेल त्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा. 

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) परीक्षेस सर्व विषयांसह प्रविष्ट होऊन उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लगतच्या दोनच संधी श्रेणी/गुणसुधार (Class Improvement Scheme) उपलब्ध होईल, असेही त्यांनी कळविले आहे.

Team Lokshahi News