Categories: Featured आरोग्य सामाजिक

2.2 अब्ज लोकांकडे सतत हात धुण्यासाठी पाणीच नाही…

नवी दिल्ली। कोरोनामुळे संपूर्ण जगाचीच चिंता वाढवली आहे. सर्वच देश कोरोनावर मात करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. महत्वाचे प्रतिबंधक उपाय म्हणून कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग आणि अर्धा-एक तासाने २० सेकंद साबणाने हात धुणे गरजेचे असल्याचे सांगितले जात आहे. मात्र संयुक्त राष्ट्र संघाच्या एका अहवालातून एक धक्कादायक माहिती समोर आली असून जगभरातील करोडो लोकांना हात धुण्यासाठी पाणीच उपलब्ध नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

संयुक्त राष्ट्र संघाच्या आकडेवारीनुसार जगातील तब्बल २.२ अब्ज लोकांकडे पाण्याची सोय नाही. त्यामुळे कोरोनापासून वाचण्यासाठी त्यांना सतत हात धुणे शक्य नाही. तर दुसरीकडे जगातील जवळपास ५० टक्के ग्रामीण लोकसंख्या आणि २० टक्के शहरी लोकसंख्या चांगल्या आरोग्य सुविधांपासून दूर आहे, असेही या अहवालात म्हटले आहे. यामुळे जगभरात सध्या कोणत्या स्वरूपाची भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे याचा केवळ अंदाजच लावला जाऊ शकतो.

कोरोनाविरोधातील लढाई जगासाठी खूप महागडी ठरणार आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या अहवालामध्ये असे म्हटले आहे की, सद्य परिस्थिती पाहता जगातील १० टक्के जीडीपी एवढी रक्कम कोरोनाच्या लढाईसाठी खर्च होण्याची शक्यता आहे. या अहवालात पुढे असे देखील सांगितले आहे की, सद्यस्थितीत जगातील देशांना उत्पादनांवरील प्रतिबंध विसरुन एकत्र आले पाहिजे आणि कोणतेही कठोर नियम न ठेवता आयात-निर्यात चालू ठेवण्यास परवानगी द्यावी लागेल. तसंच, त्यांना कोरोनाशी लढण्यासाठी आवश्यक असलेल्या उत्पादनांवरील कर देखील रद्द करावा लागेल.

कोरोनामुळे परदेशात काम करणारे कामगार सर्वात जास्त प्रभावित झाले असल्याचे संयुक्त राष्ट्र संघाच्या अहवालात म्हटले आहे. जगातील अनेक देशांच्या अर्थव्यवस्था या कामगारांच्या कमाईवर अवलंबून असतात. अशामध्ये, परदेशात काम करणारे कामगार भारतासारख्या विकसनशील देशांच्या परकीय चलन उत्पन्नात हातभार लावतात. या अहवालानुसार जगातील बर्‍याच देशांनी आपल्या सीमा बंद केल्या आहेत. यामुळे प्रवासी कामगारांच्या अडचणी सुद्धा वाढल्या असून उत्पन्नावर मोठा परिणाम झाला आहे.

Rajendra Hankare