मुंबई | पंतप्रधान किसान शेतकरी सन्मान योजनेत तामिळनाडू, उत्तरप्रदेश, ओडिसा या राज्यांबरोबरच आता महाराष्ट्रातही मोठा घोटाळा झाल्याचे उघड झाले आहे. या योजनेच्या माध्यमातून अपात्र लाभार्थ्यांनी आत्तापर्यंत करोडो रूपयांवर डल्ला मारला असून अपात्र असूनही लाभ उकळणाऱ्यांकडून आता सक्तीने वसूली केली जाणार आहे.
पीएम किसान योजनेच्या माध्यमातून सरकार अल्प भूधारक शेतकऱ्यांना वर्षाला ६ हजार रूपयांची मदत देते. कुटूंबातील पती, पत्नी व १८ वर्षाखालील अपत्यांपैकी एकालाच या योजनेचा लाभ मिळतो. यामध्ये व्यवसाय कर भरणारे शेतकरी, डॉक्टर, वकील, सरकारी नोकरी करणारे, निवृत्त, पेन्शनधारक, स्थानिक स्वराज्य संस्थांचे लोकप्रतिनिधी, अशा लोकांना या योजनेचा लाभ घेता येत नाही. अशा अपात्रांच्या यादीत समावेश असतानाही काहींनी खोटी माहिती देत शासनाची फसवणूक करून हा निधी लाटला आहे. काही लोकांनी तर मृत शेतकरी व्यक्तींच्या नावावरही लाभ उकळल्याचे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, राज्यातील आयकर भरणाऱ्या २ लाख ३० हजार २८२ शेतकऱ्यांकडून २०८ कोटी ५० लाख ९० हजारांची वसूली करण्यात येणार आहे. सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सरकारच्या वतीने तसे आदेश देण्यात आले असून वसूलीची मोहिम प्रत्येक तालुका पातळीवर गतीमान करण्यात आली आहे. यात सर्वाधिक शेतकरी हे सातारा आणि नगर जिल्हातील असून त्यांची संख्या प्रत्येकी १९ हजारांच्या वरती आहे. तसेच पुणे १० हजार, जळगाव १३ हजार ९४२, सोलापूर १३ हजार ७९३, कोल्हापूर १३ हजार ६०९, सांगली १३ हजार ६१, नाशिक १२ हजार ५४ इतक्या शेतकऱ्यांचा समावेश आहे. अन्य जिल्ह्यातील शेतकऱ्यांची संख्याही १ ते ८ हजारांच्या आसपास आहे, तर गडचिरोलीत मात्र ७७१ शेतकऱ्यांचा या यादीत समावेश आहे.
काही ठिकाणी नावावर शेती नसणे व अन्य कारणांमुळे शेतकरी या योजनेसाठी अपात्र ठरले आहेत. अशा शेतकऱ्यांची संख्या १ लाख ७ हजार आहे. या शेतकऱ्यांनी उचलेल्या २ लाख १३ हजार ५०५ हप्त्यांची ४२ कोटी ७० लाख १० हजार रुपये रक्कम सरकारकडून वसूल केली जाणार आहे. यात नगर जिल्ह्यातील १९ हजार ४०१ शेतकरी असून त्यांच्याकडून ८ कोटी ९ लाख रुपयांची वसूली केली जाणार आहे. याबरोबरच यवतमाळमधील ८ हजार ६०५ शेतकऱ्यांकडून चार कोटी ९५ लाख, सांगली जिल्ह्यातील १२ हजार ६०७ जण आयकर भरणारे तर १ हजार ६६० अन्य अपात्र शेतकरी आहेत. अशा १४ हजार २६७ बोगस लाभार्थ्यांकडून ही रक्कम वसूल केली जाणार आहे.