मुंबई। कोरोना विषाणूच्या संकटावर मात करण्यासाठी देशभरातील विविध सामजिक संस्था, खासगी कंपन्या आणि सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या व्यक्तीमत्वांकडून मदतीचा ओघ सुरु झाला आहे. यात टाटा ट्रस्टने आघाडी घेतली असून पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी तब्बल ५०० कोटींच्या मदतीची घोषणा केली आहे. टाटा ट्रस्टचे अध्यक्ष रतन टाटा यांनी ट्विटरच्या माध्यमातून यासंदर्भातील माहिती दिली आहे. त्यांनी ट्विटमध्ये लिहिलंय की, कोरोनाचं संकट हे मानवासमोरील कठीण आव्हान आहे. टाटा ट्रस्ट आणि टाटा समूहाने यापूर्वी कठिण प्रसंगात देशासाठी आवश्यक योगदान दिले आहे. आतापर्यंतचा हा देशासमोरील सर्वात मोठा प्रसंग असून या संकटातही टाटा ट्रस्टकडून ५०० कोटींची मदत करण्यात येईल.
देशातील विविध सामाजिक संस्था, समुदाय, व्यक्ती सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मदत करू लागले आहेत. त्याच भावनेने टाटा ट्रस्टकडून सर्व समुदायाचे सशक्तीकरण आणि सुरक्षितेसंदर्भातील प्रतिज्ञाचे पालन करत मदत जाहीर करण्यात आली आहे. सध्याच्या कठिण परिस्थितीत सर्वात पुढे येऊन काम करणारे आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी, टेस्टिंग किट आणि अन्य आवश्यक उपकरणांसाठी हा निधी देणार असल्याचा टाटांकडून उल्लेख करण्यात आला आहे.
सध्या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन केंद्र सरकारने संपर्ण देशात लॉकडाऊनची घोषणा केली आहे. देशाला मोठ्या संकटातून बाहेर काढण्यासाठी अनेक संघटना आपापल्या परीने मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि पंतप्रधान सहाय्यता निधीमध्ये मदत जमा करत आहेत. काही खासगी कंपन्यांनी शेअर्सच्या स्वरुपातही मदत दिली आहे. टाटा ट्रस्टकडून झालेली घोषणा ही आतापर्यंतची एका समूहाकडून मिळालेली सर्वाधिक मदत आहे.