नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कृषिक्षेत्राच्या पायाभूत सुविधांसाठी तब्बल १ लाख कोटी रूपयांच्या निधीची घोषणा करणार आहेत. याच दरम्यान पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्यापोटी १७ हजार कोटी रूपयांचेही वाटप केले जाणार आहे. पीएम किसान योजनेचा सहावा हप्ता कधी मिळणार याची शेतकरी वर्गात उत्सुकता आहे. सरकारने १ ऑगस्ट पासून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्यासाठीची प्रक्रिया सुरू केली असली तरी प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम आज ९ ऑगस्ट रोजी जमा होणार आहे. याबाबत चे वृत्त लोकशाही.न्यूज अचूकरित्या ८ ऑगस्ट रोजी सकाळीच प्रसिध्द केले होते. याची अधिकृत माहिती पीएमओ कार्यालयाकडून रात्री उशिरा देण्यात आली आहे.
केंद्र सरकारने १ ऑगस्टपासून शेतकऱ्यांच्या खात्यात ६ व्या हप्त्याचे पैसे देण्याचे घोषित केले होते. त्यानुसार सर्व तयारी करण्यात आली असून शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्यक्षात ९ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता हे पैसे जमा होणार आहेत. तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून कृषिक्षेत्राच्या पायाभूत सुविधांसाठी १ लाख कोटींच्या पॅकेजची घोषणा केली जाणार आहे. त्यानंतर पीएम किसान योजनेतील पैसे हस्तांतरणाची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे.
पीएम किसान योजना ही देशभरातील शेतकऱ्यांना थेट आर्थिक लाभ मिळवून देणारी देशातील सर्वात मोठी आणि महत्वाची योजना असल्याचे सांगितले जात आहे. याचा आत्तापर्यंत देशातील ८ कोटी ५३ लाख शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे. तर काही शेतकऱ्यांना १, २, ३ अशा स्वरूपात हप्ते मिळाले आहेत. तर उर्वरित हप्ते मिळणे बाकी आहे.
देशातील साडे चौदा कोटी शेतकऱ्यांना या योजनेच्या माध्यमातून लाभ देण्याचा सरकारचा उद्देश आहे. त्यामुळे अद्यापही अनेक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत नसल्याचे सांगितले जात आहे. राज्य सरकारही जास्तीत जास्त पात्र शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी विशेष मोहिम राबवत असून ज्या शेतकऱ्यांना अद्याप या योजनेपासून वंचित रहावे लागले आहे, त्यांनी त्वरित सेवा केंद्र अथवा सरकारी यंत्रणेशी संपर्क साधून या योजनेसाठी नोंदणी करावी.