Categories: Featured

देशातील ८० कोटी लोकांना दिवाळीपर्यंत मिळणार ‘या’ योजनेचा लाभ..!

नवी दिल्ली | लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर देशातील उद्योगधंदे बंद पडल्याने अनेकांना बेरोजगार व्हावं लागलं आहे. अनेकांवर उपासमारीचीही वेळ आली आहे. हातावरचे पोट असणाऱ्यांना दैनंदिन गरजा कशा भागवायचा हेच सुचेना झालं आहे. अशा परिस्थितीत देशातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारच्यावतीने विविध योजना राबवल्या जात आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशाला संबोधित करताना देशातील गरिबांसाठी सुरू केलेल्या मोफत धान्य योजनेचा कालावधी वाढवण्यात आल्याचे स्पष्ट केले. ही योजना आता दिवाळी अर्थात नोव्हेंबर महिन्यापर्यंत लागू राहणार असून याचा लाभ देशातील ८० कोटी लोकांना मिळणार आहे. (pm-gareeb-kalyan-anna-yojana-benefit-still-november)

या योजनेअंतर्गत दर महिन्याला पाच किलो गहू किंवा पाच किलो तांदूळ मोफत दिले जातील, सोबतच प्रत्येक परिवाराला दर महिन्याला एक किलो डाळही मोफत दिली जाणार आहे. दरम्यान पंतप्रधान यांनी याचे श्रेय हे शेतकरी आणि कर दात्यांना दिले आहे. शेतकऱ्यांमुळे आपल्या देशातील अन्न भंडार भरलेले असल्याने आज गरीब लोकांच्या घरात चूल पेटत आहे. तर करदात्यांनी प्रामाणिकपणे कर भरल्याने देशातील गरीबांना या संकटाशी सामना करताना मदत होत आहे. ही योजना जुलै ते नोव्हेंबर या काळातही सुरु राहणार आहे. यासाठी ९० हजार कोटींपेक्षा जास्त खर्च होणार आहे. मागील तीन महिन्यांचा खर्च जोडला तर ही रक्कम दीड लाख कोटीच्या घरात जाते. 

यावेळी, मोदींनी संपूर्ण देशात वन नेशन वन रेशन कार्ड योजनाही लवकरच लागू केली जाणार असल्याची घोषणा केली. मागील तीन महिन्यात आपण गरीबांना मोफत अन्न धान्य दिले. पाच किलो गहू किंवा तांदूळ, एक किलो डाळ आणि एक किलो चणे असे धान्य मोफत दिले, अशाच प्रकारे नोव्हेंबरच्या शेवटपर्यंत आपण गरीबांना धान्य मोफत देणार आहोत, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.

Team Lokshahi News