कृषिविधेयका संदर्भातली शेतकरी आणि केंद्र सरकारची सहावी बैठक रद्द
नवी दिल्ली | सध्या देशभर गाजत असलेल्या कृषिविधेयकाच्या मुद्यावरून शेतकरी आणि केंद्र सरकारची होणारी सहावी बैठक रद्द करण्यात आली आहे. काल उशिरा रात्री अमित शहा आणि 13 शेतकरी नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत कायदा सुधारणा करायला आम्ही तयार आहोत सांगण्यात आले. मात्र रद्द करायला ठामपणे नकार देण्यात आला आहे. आज बारा वाजता केंद्र सरकारतर्फे शेतकऱ्यांना लेखी आश्वासन दिले जाण्याची शक्यता असून त्यानंतर शेतकरी पुढील रणनिती ठरवतील असे सांगण्यात येत आहे.
नाशिक – दिंडोरीत येथे शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत 6 दुकानं भस्मसात
नाशिक | दिंडोरी येथील पालखेड रोड लगत असलेल्या दुकानांना पहाटेच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. या आगीत 6 दुकान भस्मसात झाली असून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अग्निशमन विभागाला 2 तासांच्या प्रयत्नांनंतर ही आग आटोक्यात आणणे शक्य झाले.
कोल्हापूर – जिल्हा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत प्रथेप्रमाणे राडा
कोल्हापूर | कोल्हापूर जिल्हा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत राडा झाला. कार्यकारी मंडळाची निवड करण्याच्या विषयावरुन सत्ताधारी विरोधकांमध्ये चांगलीच झटापट पहायला मिळाली. एकमेकाविरोधात जोरदार घोषणाबाजी आणि गोंधळातच सगळे विषय मंजूर करत ही सभा गुंडाळण्यात आली. यानंतर विरोधकांनी समांतर सभा घेत वार्षिक सर्वसाधारण सभा बेकायदेशीर असल्याचा आरोप करून निषेध व्यक्त केला.
नागपूर – लवकरच कोरोना लस येण्याची शक्यता
नागपूर | जिल्ह्यात डिसेंबरच्या शेवटी किंवा जानेवारीच्या सुरुवातीला लस येण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात एकूण 2,661 कोरोना लसीकरण असणार आहेत. यापैकी मनपा हद्दीत 902 तर ग्रामीणमध्ये 1,759 लसीकरण केंद्र असणार आहेत.येणारी लस वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना सर्वात आधी दिली जाणार आहे. याबाबत टास्क फोर्सच्या बैठकीत माहिती सादर करण्यात आली आहे. लसीकरणासाठी 579 परिचारिकांची नोंदणी करण्यात आलीय.
पुणे – कोरोना लसीकरणासाठी जोरदार तयारी सुरू, टास्क फोर्स तयार
पुणे | पुण्यातील कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी लसीकरणाची जोरदार तयारी करण्यात आली आहे. पुण्यात कोरोना लस टास्क फोर्स तयार करण्यात आलाय. जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात हा टास्कफोर्स तयार करण्यात आला असून जिल्ह्यातील 31,195 आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिल्यांदा ही लस दिली जाणार आहे. लसीच्या कोल्ड स्टोअर्ससाठी चार कंपन्याशी चर्चा सुरू असून ही लस खाजगी जागेत स्टोअर करण्यात येणार आहे.
रत्नागिरी – जिल्ह्यात 16 लाख कोरोना लस स्टोअरेजची क्षमता
रत्नागिरी | जिल्ह्यात 16 लाख कोरोना लस स्टोअरेजची क्षमता निर्माण करण्यात आली असून उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्र्यांकडून याचा आढावा घेण्यात आला. आता दिवसाला 10 हजार जणांना लस देण्याची आरोग्य विभागाची तयारी आहे. आजपासून जिल्ह्यात कोरोना तपासणीची संख्या दोन हजारावर नेली जाणार असून यामध्ये 60 टक्के अँटिजेन टेस्ट तर 40 टक्के आरटीपीसीआर चाचण्या केल्या जाणार आहेत.
जगप्रसिद्ध नागपुरी संत्र्यांचे दर कोसळले, घाऊक बाजारात संत्री 8 ते 15 रुपयाला किलो
नागपूर | आपल्या चवीसाठी जगप्रसिद्ध असलेल्या नागपुरी संत्र्यांच्या दरात मोठी घसरण झाली आहे. कळमना फळबाजारात संत्र्याला 8 ते 15 रुपये प्रति किलो असा घाऊक दर मिळाला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत हा दर निम्मा असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. दर कोसळल्याने उत्पादन खर्चही निघत नसल्याचे संत्राउत्पादक शेतकऱ्यांनी सांगितले. यंदा उत्पादन चांगले आले आहे परंतु दर गडगडल्याने मोठे नुकसान सोसावे लागल्याचे शेतकरी सांगत आहेत.
सोलापूर – नरभक्षक बिबट्याच्या शोधासाठी थर्मल सेंटर इमेज ड्रोन आणि श्वानपथकाचा वापर
सोलापूर | करमाळा तालुक्यातील शेटफळ परिसरात दहशत माजवलेल्या बिबट्याच्या शोधासाठी थर्मल सेंटर इमेज ड्रोन आणि श्वानपथकाचा वापर करण्यात येणार आहे. उजनी बॅकवॉटरला ऊस आणि केळी क्षेत्र जास्त असल्याने बिबट्याचे नेमके ठिकाण शोधण्यासाठी अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. या नरभक्षक बिबट्यासह परिसरात आणखी बिबट्यांचा वावर असल्याची शक्यता वनविभागाने वर्तविली आहे. यामुळे परिसरात वन विभागाने गस्त सुरू केली आहे.