Categories: सामाजिक

वाचा – कोरोनाग्रस्त इटलीच्या रोम शहरातून मुंबईत परतलेल्या मराठी तरुणाची अंगावर शहारे आणणारी कैफियत

मुंबईचा एक तरूण कोरोना व्हायरसमुळे ठप्प पडलेल्या रोममध्ये अडकला. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी तो भारतात परतला. पण इथेही आता त्याला १४ दिवस एकांतात रहावं लागतंय. तो विमनस्क करून टाकणारा अनुभव त्याने बीबीसी मराठीसोबत शेअर केला. जाणून घेऊया त्याच्याच शब्दात. (त्रास होऊ नये म्हणून त्याचं नाव जाहीर न करण्याचं आम्ही ठरवलं आहे)

गेली दोन वर्षं नोकरीच्या निमित्ताने मी रोममध्ये वास्तव्याला आहे. रोम शहर सध्या पूर्णपणे ठप्प आहे. कोरोना विषाणूच्या छायेखालच्या, ओस पडलेल्या शहरातून निघून, तपासण्या पार करत भारतात घरी पोहोचण्याचा हा माझा अनुभव. ” मी राहतो त्या रोम शहरात सध्या सगळं बंद आहे. कंपल्सरी बंद. शॉपिंग मॉल बंद, शाळा बंद, सगळ्या युनिव्हर्सिटीज बंद. ‘I Stay At Home’ अशी नवी मोहीमच त्यांनी सुरू केलीय. एखाद्या स्लोगनवर जशी एखादी चळवळ चालते, तसं त्यांनी आता सुरू केलंय. सगळ्यांनी कम्पलसरी घरी बसायचं. सार्वजनिक सगळं बंद. अगदी अंत्ययात्रा आणि लग्नही बंद.

एका रुग्णापासून या सगळ्याला सुरुवात झाली. इटलीतला तो झिरो पेशंट सापडला नाही, पण बघता बघता पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा १६ हजारांवर गेला. तिथे रोज संध्याकाळी ६ वाजता ही आकडेवारी अपडेट होते. इटलीची लोकसंख्या आहे सुमारे ६० मिलियन. म्हणजे ६ कोटी. पण त्यामध्ये उत्तरेकडच्या लॉम्बार्डिया भागात या कोरोना व्हायरसचा सगळ्यात जास्त प्रादुर्भाव आहे. कारण तिथलं मिलान शहर हे आपल्या मुंबईसारखं आहे. ते तिथलं आर्थिक केंद्र आहे. या लॉम्बार्डियाची लोकसंख्या आहे सुमारे १ कोटी. म्हणजे एकूण लोकसंख्याच्या 1/6 लोक या भागात राहतात. उरलेली लोकसंख्या इतर १९ राज्यांमध्ये आहे. यावरून तुम्हाला मिलानमधल्या लोकसंख्येच्या दाटीवाटीचा अंदाज येईल. म्हणूनच या भागात लागण झपाट्याने पसरली.

उत्तरेकडच्या लॉम्बार्डिया, मिलान, व्हेनिस या भागांत जसजसा प्रादुर्भाव वाढत गेला तसतसे हे भाग ‘लॉकडाऊन’ करण्यात आले. त्यांना ‘रेड झोन’ जाहीर करण्यात आलं. १० तारखेच्या संध्याकाळपासून इटली सरकार पूर्ण लॉकडाऊन जाहीर करणार होतं. पण आदल्या संध्याकाळी ही बातमी फुटली आणि सगळीकडे पसरली. हे कळल्याबरोबर प्रचंड संख्येत लोकांनी मिलान स्टेशन गाठलं आणि आपापल्या मूळ गावात परत गेले. दक्षिण इटलीमधून असंख्य लोक नोकरीकरता उत्तरेतल्या मिलानला येतात. यातले अनेकजण परत गेले आणि मग ‘लॉकडाऊन’चा मूळ हेतूच निष्फळ ठरला. यानंतर आता त्यांनी संपूर्ण देशच लॉकडाऊन करून टाकलाय.

मी आकडेवारीवर नजर ठेवायला सुरुवात केली तेव्हा पॉझिटिव्ह पेशंट्सची संख्या होती ४५०. मग ७५०, ११००, १४००, २३०० अशी झपाट्याने ही संख्या वाढत गेली. रोजच्या मृत्यूंचा आकडादेखील इथे मोठा आहे. युरोपातल्या देशात ही मोठी गोष्ट आहे. मी रोममध्ये राहतो. लाझियो भागात ते येतं. इथे २०० जणांना लागण झालेली आहे. इटलीच्या उत्तरेपासून दक्षिणेकडे जसे आपण येतो, तशी संसर्गाची आकडेवारी कमी होते.

इटलीत राहणाऱ्या भारतीयांसाठी भारतीय दूतावासाने एक २४ तास उपलब्ध असणारा फोन नंबर उपलब्ध करून दिला होता. कधीही फोन केला तरी ते तुमचं बोलणं शांतपणे ऐकून घेत आणि प्रश्नांची उत्तरं देत. खूप छान सहकार्य केलं त्यांनी. मी त्यांना दर २ दिवसांनी फोन करायचो. तुम्हाला काय वाटतं? मी इथे थांबू का परत जाऊ? काय करू? हे मी त्यांना विचारत होतो. शनिवारी (७ मार्च) मी त्यांना फोन केला. ते म्हणाले ‘तुम्हाला जर भारतात जायचं असेल तर सोमवारी रात्रीपर्यंत तुम्ही भारतात दाखल व्हा. रात्री १२च्या आत. त्याच्या नंतर तुम्हाला मेडिकल सर्टिफिकेट लागेल. हे सर्टिफिकेट देणं आमच्या (दूतावासाच्या) हातात नाही, ते इटालियन अधिकारी देणार. आणि जोपर्यंत सर्टिफिकेट इश्यू होत नाही, तोपर्यंत तुम्हाला देश सोडता येणार नाही.’ आणि इटालियन आरोग्य अधिकाऱ्यांवर त्यावेळी इतर गोष्टींचा प्रचंड ताण होता.

आता भारतीय डॉक्टर्सची टीम तिथल्या भारतीय दूतावासात पोहोचली आहे. ही टीम दूतावासात बसेल, भारतीयांनी तिथे जायचं, तपासणी करून घ्यायची आणि मग सगळी पुढची प्रक्रिया करायची. शनिवारी दूतावासाशी माझं बोलणं झाल्याबरोबर मी रविवारी (८मार्च)ला इटली सोडलं. सोमवारी सकाळी मी भारतात दाखल झालो. त्यामुळे मला सर्टिफिकेटची गरज लागली नाही. कारण तोपर्यंत निर्बंध लागू झाले नव्हते. आणि हे खूप आधीच जाहीर करण्यात आलं होतं. फेसबुक पेजवरूनही याविषयीची माहिती देण्यात आली होती.

इटलीहून निघताना बोर्डिंग करतानाच, विमानात जाण्याआधी त्यांनी आम्हाला २ फॉर्म्स दिले. हे ‘सेल्फ डिक्लरेशन’ फॉर्म्स होते. यामध्ये तुमचं नाव, भारतातला पत्ता, फोन नंबर, फ्लाईट नंबर, सीट नंबर, कुठून निघालात – कुठे चाललायत याविषयीची माहिती भरायची होती. दिल्लीला लँड झाल्या झाल्या त्यांनी आधी आमचं स्क्रीनिंग केलं. थर्मल चेकअप करण्यात आला. फॉर्ममधली सगळी माहिती भरलेली आहे का, हे तपासण्यात आलं. त्यावर स्टँप मारून तो सबमिट करून घेतला. दुसरा फॉर्म इमिग्रेशनच्या वेळी सबमिट केला. म्हणजे आता माझ्या विमानातल्या कोणाला लागण झाल्याचं सापडलं, तर अधिकारी आम्हा सगळ्यांशी संपर्क करू शकतील, याची पूर्ण काळजी घेण्यात आलेली आहे.

दिल्ली विमानतळावर बाहेरून येणाऱ्या लोकांसाठी दोन वेगळे भाग करण्यात आले आहेत. एक भाग – संसर्ग झालेल्या देशातून येणाऱ्या लोकांसाठी आणि दुसरा – इतर देशांतून येणाऱ्या लोकांसाठी. पण ही सगळी कारवाई अगदी सुरळीत पार पडतेय. सगळ्या गोष्टींची चांगली काळजी घेतली जातेय. अधिकारी खूप मेहनत करतायत. दूतावासानेही खूप सहकार्य केलं मला. भारतात येताना आम्हाला फ्लाईटमध्ये पुढचे २८ दिवस काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. स्वतःची निगा रागा, आरोग्यावर लक्ष ठेवा, संसर्गाची लक्षणं स्वतःमध्ये दिसतायत का याकडे लक्ष द्या, गर्दीत जाणं किंवा आजारी व्यक्तींना भेटणं टाळा या सगळ्या गोष्टी आम्हाला विमानात सांगण्यात आल्या.

आता मी ‘सेल्फ क्वारंटाईन’ आहे. ही सगळी काळजी घेतोय. माझे वडीलही आत्याकडे गेलेयत. घरी मी आणि आई असे दोघेच आहोत. अगदी आमच्याकडे काम करणाऱ्या बाईंनाही पुढचे १० दिवस सुट्टी दिलीय. मी येण्याआधीच हे सगळं सांगितलं होतं त्यामुळे सगळं सामान आणून ठेवलंय. त्यामुळे मी घरी आल्यानंतर दरवाजा जो बंद केलाय, तो अजून परत उघडलेला नाही. माझ्यामुळे चुकूनही इतर कोणाला धोका निर्माण व्हावा असं मला वाटत नाही.

युरोपातल्या शेंगेन (Schengen) भागातल्या लोकांना एका देशातून दुसऱ्या देशात व्हिसा शिवाय प्रवास करता येतो. याचा फार मोठा फटका तिथे बसला. म्हणूनच स्पेन, जर्मनी, फ्रान्स या युरोपातल्या इतर देशांतही या विषाणूची लागण मोठ्या प्रमाणावर झालीय. एरवीचं गजबजलेलं रोम पाहण्याची सवय असलेल्या मला, असं ओसाड पडलेलं रोम पाहणं हा अगदी वाईट अनुभव होता. लॉकडाऊन मध्ये असलेले लोक आता एकमेकांशी बाल्कनीतून गप्पा मारतात, मिळून फुटबॉलची गाणी म्हणतात, वेगवेगळी वाद्यं वाजवतात. माझ्याकडे भारतात येण्याचा पर्याय होता म्हणून मी तिथून बाहेर पडलो. पण माझी मित्र मंडळी तिथे आहेत. मी त्यांच्या संपर्कात आहे. परिस्थिती सुधारली की मी पुन्हा परत जाईन. (सौजन्य बीबीसी मराठी)

Team Lokshahi News