Categories: Featured राजकीय हुणार तरास, पण गुणं हमखास..

आदित्यवर नेम, उध्दवाचा गेम..!

स्नेहल शंकर
अभिनेता सुशांत सिंग रजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयच्या हाती गेल्यापासून राज्यातील भाजपमध्ये उत्साहाचे भरते आले आहे. याप्रकरणी महाराष्ट्रात किंबहुना देशातच राजकीय नाटकाचे अनेक अंक पाहावयास मिळाले. सोबतच यात मिडीया ट्रायल सुरू झाल्यापासून सर्व माध्यमांमध्ये नक्की आरोपी कोण? हे शोधण्याची शर्यतच लागली. माध्यमकर्मींनी तर पोलिसांची भूमिकाही पार पाडली. हद्द तर इथे झाली काही माध्यमकर्मींनी तर आरोपपत्र दाखल करण्यापासून ते न्यायदानापर्यंतचे सर्व सोपस्कर निर्विघ्नपणे पार पाडले. मिडीया ट्रायलच्या गोंधळामुळे सरतेशेवटी हे प्रकरण सीबीआयकडे वर्ग करण्यात आले. 

पहायला गेल्यास, आज पर्यंतची सीबीआयची बऱ्याचशा प्रकरणांमधली भूमिका विवादास्पद राहिली आहे. सुशांतसिंग आत्महत्येप्रकरणी ही शिखर संस्था काय शोध लावेल हा तपासाचा भाग आहे. मात्र यातून महाराष्ट्रात सत्ताबदलाच महानाट्य घडल्यास आश्चर्य वाटायला नको. आज बरेच वरिष्ठ राजकीय तज्ञ आणि भावना विवश झालेल्या जनतेला असे वाटते की, बिहार निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सीबीआयचा बोलका पोपट राजकीय आखाड्यात उतरवला आहे. काहीअंशी हे सत्यही असेल पण याहीपेक्षा अधिक महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा काडीमोड करण्याचा डावच यात दिसतो. 

जेव्हापासून याप्रकरणात पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे नाव उघडपणे घेतले जाऊ लागले, तेव्हापासून केंद्रातील सुप्रीम पॉवरने यात ताबडतोब लक्ष घातले. सुशांतसिंग आत्महत्याप्रकरणी मुळापर्यंत जाऊन तपास होण्याची शक्यता ही शेवटी राजकीय समिकरणांवरच अवलंबून आहे. यामध्ये पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरेचं सीबीआयच्या रडारवर असण्याची दाट शक्यता आहे. महाराष्ट्रातील विरोधी बाकावर बसणाऱ्या भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या मागण्यांकडे बघता ही शक्यताही नाकारता येत नाही. आदित्य ठाकरे चौकशीच्या फेऱ्यात अडकल्यास तपास कार्य निपक्षपातीपणे व्हावे यासाठी विरोधक मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा यासाठी रान उठवणार. त्यामुळे नैतिक जबाबदारी स्विकारून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना राजीनामा द्यावा लागू शकतो. असे झाल्यास मुख्यमंत्री पदासाठी सेनेत कोणताही सर्वमान्य चेहरा नाही किंबहुना सेना नेतृत्वही असा कोणता चेहरा पुढे येऊ देणार नाही. दुसरी शक्यता अशी की, चौकशी पूर्ण होईपर्यंत मुख्यमंत्री पद राष्ट्रवादीकडे देऊन सेना नेतृत्व केंद्राच्या सूडबुध्दीच्या राजकारणाविरोधात दंड थोपटू शकते. पण यासर्व घडामोडीदरम्यान मुंबई व उपनगरातील राष्ट्रवादीशी सख्य नसलेला नाराज सेना गट फुटून बाहेर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. याचा लाभ घेत विरोधात बसलेला भाजप एकतर सत्तास्थापनेसाठी प्रयत्न करेल अथवा राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी प्रयत्न करण्याची शक्यता आहे. 

एकूणच, सीबीआय चौकशीच्या आडून आपला कट्टर हिंदुत्ववादी प्रतिस्पर्धी संपवण्याचा भाजपचा डाव आहे. सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास “आदित्यवर नेम धरत उध्दवचा गेम” करणारा बाण भाजपने सोडला म्हणण्यास वाव आहे. पण याही ठिकाणी महाभारतातील युध्दाप्रमाणे धनुर्धारी ‘पार्थ’ला नेम धरायला लावणारा कृष्ण कोण? हे मात्र प्रभू श्रीरामच जाणे! 

Snehal Shankar

Journalist

Share
Published by
Snehal Shankar
Tags: aditya thackeray Ajit Pawar CBI Devendra Fadanvis disha Salian Narayan Rane NCP Parth Pawar Sharad Pawar Sushant singh rajput Uddhav Thackeray