मुंबई। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी करू पाहणाऱ्या ‘आज के शिवाजी-नरेंद्र मोदी’ या वादग्रस्त पुस्तकावरून सर्वत्र संतप्त पडसाद उमटल्यानंतर लेखक जयभगवान गोयल यांनी ते पुस्तक मागे घेतले आहे, अशी माहिती भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली.
प्रकाश जावडेकर यांनी ट्विटवरून ही माहिती दिली असून, छत्रपती शिवाजी एक महाराज महान राज्यकर्ते होते. त्यांनी लोकांच्या कल्याणासाठी अथक परिश्रम घेतले. आमच्यासाठी ते सदैव प्रेरणास्थानी असतील. या पुस्तकाशी भाजपचा काहीही संबंध नसल्याचे सांगून लेखकाने याबाबत माफीही मागितली स्पष्ट केले.
तत्पूर्वी सोमवारी पुस्तकाचे लेखक जयभगवान गोयल यांच्याविरोधात राज्यात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासह विविध शिवप्रेमी संघटनांनी तीव्र आंदोलने केली. काही ठिकाणी संबंधित लेखकाचे पुतळे व प्रतिमा जाळण्यात आल्या, तसेच हे पुस्तक तातडीने मागे घेण्याची मागणी करण्यात आली. विविध ठिकाणी यांचे संतप्त पडसाद उमटत असताना आणि विविध राजकीय पक्ष आणि संघटना रस्त्यावर उतरल्या असताना भाजपने मात्र हे निव्वळ राजकारण सुरू असल्याचे मत व्यक्त केले होते.
कोल्हापूरमध्ये युवक काँग्रेसने आरएसएस, भाजप, नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले. भाजपच्या पोस्टरवर यापुढे छत्रपती शिवाजी महाराजांचे फोटो लावू देणार नसल्याचा इशाराही यावेळी आंदोलकांनी दिला. शिवसेनेतर्फे गोयल यांचा निषेध करण्यात आला. संतप्त शिवसैनिकांनी गोयल यांच्या पोस्टरला कोल्हापुरी चपला मारल्या. तर नाशिकमध्ये अनेक संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन पुस्तक मागे घेण्याची मागणी केली. प्रहार जनशक्ती पक्षातर्फे जयभगवान गोयल यांच्या प्रतिमेस ‘चप्पल मारो आंदोलन’ करण्यात आले. तसेच भुसावळ व मुक्ताईनगर येथे मराठा समाज मंडळ व मुस्लीम समाजातर्फे पुस्तकावर बंदी घालण्याचे निवेदन प्रांत व तहसीलदारांना देण्यात आले.
दरम्यान पुस्तकाशी भाजपचा संबंध नाही म्हणत बाजू काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी चुप्पी साधल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे भाजपच्या दिल्लीतील कार्यालयातच या पुस्तकाचे प्रकाशन कसे झाले, यावर भाजपचे नेते बोलण्यास तयार नाहीत. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचेच नव्हे, तर संपूर्ण देशाचे आराध्य दैवत आहेत, असे भाजप नेहमी म्हणत असतो, असे असताना स्वतःच्या कार्यालयात पुस्तकाचे प्रकाशन करून नंतर त्याच्याशी भाजपचा काही संबंध नाही असे म्हणणे म्हणजे निव्वळ ढोंगीपणा असल्याचे मत अनेक शिवप्रेमींनी व्यक्त केले आहे.