Categories: Featured आरोग्य सामाजिक

पुणे : ३०० कोटी रुपयांचे जम्बो आयसोलेशन हॉस्पिटल उभारण्याआधी बंद अवस्थेत असलेली पुणे मनपाची सुरु करा : आम आदमी पक्षाची मागणी

पुणे | ३०० कोटी रुपयांचे जम्बो आयसोलेशन हॉस्पिटल उभारण्याआधी पुण्यातील बांधून तयार पण बंद अवस्थेत असलेली पुणे मनपाची रुग्णालये ताब्यात घेऊन ती सुरु करावीत; कमला नेहरू हॉस्पिटलमधील गेली ८ वर्षे बंद आयसीयु तातडीने सुरु करावा अशी मागणी पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे आम आदमी पक्षाच्यावतीने करण्यात आली आहे.

पुण्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने, पुण्यामधील बेड, ऑक्सिजन, आयसीयू आणि व्हेंटिलेटर यांच्या तुटवड्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये कोविड रुग्णांची संख्या खूप जास्त वाढून दीड ते दोन लाखांपर्यंत जाईल असा अंदाज महानगरपालिकेने व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर बेड, ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर यांची उपलब्धता हा अतिशय कळीचा मुद्दा झालेला आहे. हा प्रश्न सोडवण्यासाठी जम्बो आयसोलेशन हॉस्पिटल उभारण्याचा आपला मानस आहे आणि त्यासाठी साधारणपणे 300 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे असे समजते. यातील कोणी किती पैसे द्यावे यावरून भाजपा सत्तेत असलेल्या महानगर पालिकेच्या स्थायी समितीकडून राजकारण देखील खेळले जात आहे. त्याऐवजी पुण्यातील बांधून तयार पण बंद अवस्थेत असलेली पुणे मनपाची रुग्णालये ताब्यात घेऊन ती सुरु करावीत आणि तिथे कोविडच्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी आम आदमीचे डॉ. अभिजीत मोरे यांनी केली आहे.

Team Lokshahi News