Categories: Featured आरोग्य

ऑक्सिजनच्या रेशनिंगला आम आदमी पक्षाचा तीव्र विरोध

पुणे | राज्यात कोरोनाचा कहर वाढत असल्याने भितीपोटी रूग्णालयात दाखल होणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. यामुळे गंभीर रूग्णांना वेळेत उपचार मिळण्यात अडचणी येत असून रूग्ण दगावण्याचे प्रमाणही वाढत आहे. त्यामुळे भीतीपोटी रुग्णालयात दाखल झालेल्या करोनाबाधित रुग्णांची संख्या कमी करण्यात यावी; तसेच ऑक्सिजनचे राज्यात होणारे ‘ब्लॅक मार्केटिंग’ थांबवावे, अशी मागणी करून आम आदमी पक्षाने ऑक्सिजनच्या ‘रेशनिंगला’ तीव्र विरोध केला आहे. त्यामुळे ऑक्सिजनच्या वापराबाबत काढलेल्या परिपत्रकाचा फेरविचार करण्याची वेळ राज्य सरकारवर आली आहे.

राज्यातील करोनाबाधितांना उपचार देताना ऑक्सिजनचा वापर करण्यासंदर्भात राज्य सरकारने निर्बंध आणणारे परिपत्रक काढले आहे. त्यावरून डॉक्टरांच्या संघटनांसह आता अन्य संघटनांनीही यात उडी घेतली आहे. त्यामुळे सरकार आणि संघटनांमध्ये संघर्ष सुरू झाल्याचे चित्र आहे. राज्याच्या आरोग्य सचिवांनी काढलेल्या परिपत्रकानुसार राज्यातील सर्व रुग्णालयांतील ‘ऑक्सिजन’वापराचे ऑडिट करण्यात येणार आहे. वॉर्ड पातळीवरील रुग्णाला ७ लिटर प्रति मिनिट आणि अतिदक्षता विभागातील रुग्णाला १२ लिटर प्रति मिनिट असे निकष देण्यात आले आहेत. राज्यातील ऑक्सिजनचा तुटवडा आणि रुग्णांसाठीच्या ऑक्सिजनचे रेशनिंग होणार असल्याने कोरोनाच्या रुग्णांसह नातेवाइकांमध्ये घबराटीचे वातावरण तयार झाले आहे.

“वॉर्डासह अतिदक्षता विभागातील करोनाबाधितांना वैद्यकीय गरजेनुसार आवश्यक तेवढा ऑक्सिजन उपलब्ध करून दिला जावा. त्यांच्यात कोणत्याही पद्धतीचे रेशनिंग किंवा कॅपिंग करण्यात येऊ नये. ऑक्सिजन पातळी खालावलेल्या व केवळ गंभीर रुग्णांनाच सरकारी अथवा खासगी रुग्णालयात भरती करावे; तसेच ऑक्सिजन पुरवठ्यातील ‘ब्लॅक मार्केटिंग’ला आळा घालावा व त्याच्या किमतीवर नियंत्रण आणले जावे”.
डॉ. अभिजित मोरे, राज्य प्रवक्ता, आम आदमी पक्ष

दिल्ली मॉडेल महाराष्ट्रात राबवून होम आयसोलेशन व इन्स्टिट्यूशन आयसोलेशन याची काटेकोर अंमलबजावणी करुन रुग्णालयांवरील ताण कमी करावा; केवळ भीतीपोटी रुग्णालयात कोणीही भरती होऊ नये यासाठी प्रचार, समुपदेशन करावे व शास्त्रीय उपचार मार्गदर्शिकेची योग्य अंमलबजावणी करावी तसेच ऑक्सिजन पुरवठ्यामधील ब्लॅक मार्केटिंगला आळा घालावा अशी मागणी आम आदमी पक्ष करत आहे.

Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: Corona Update