Categories: सामाजिक

मराठा समाजासाठी आनंदाची बातमी; सारथी संस्थेच्या ‘या’ मागण्या मान्य

मुंबई | छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या मराठा समाजाच्या मुक आंदोलनाची दखल घेऊन सारथी संस्थेविषयी उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्या उपस्थितीत पुणे बैठक घेण्यात आली. या बैठकीत समाजाच्या सारथी संबंधी प्रमुख बारा मागण्यांपैकी बहूतांश मागण्या पूर्णतः मान्य करण्यात आल्या.

सारथी संस्थेला पूर्णतः स्वायत्तता असल्याचे यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत पुनश्चः स्पष्ट केले. राज्यात सारथीची आठ विभागीय कार्यालये सुरू करण्यास मंजूरी देण्यात आली. कोल्हापूर येथे उपकेंद्र सुरू करण्यासाठी नियोजित जागेची पाहणी करून अहवाल देण्यासंदर्भात उपमुख्यमंत्री यांनी कोल्हापूरच्या जिल्हाधिका-यांना या बैठकीत निर्देश दिले.

प्रमुख शैक्षणिक शहरांच्या ठिकाणी सारथीच्या माध्यमातून वसतीगृह उभारणी, सारथीमधून प्रशिक्षण घेतलेल्या उमेदवारांना आण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून कर्जपुरवठा, प्रशिक्षण, संशोधन यांसाठी नवनवीन उपक्रम राबविणे या मागण्या मान्य करण्यात आल्या. सारथी लाभार्थी साठी उत्पन्न मर्यादा ८ लाख असून त्यात १ लाखाच्या आत, ३ लाखाच्या आत, ३ ते ५ लाखाच्या आत व ५ ते ८ लाखाच्या आत असे टप्पे तयार करून अभ्यासक्रम निहाय सारथी कडून देण्यात येणाऱ्या विद्यावेतनाची टक्केवारी ठरविण्यात येईल, जेणेकरून जास्तीतजास्त गरीब विद्यार्थ्यांना अधिकाधिक लाभ मिळू शकेल, यादृष्टीने निर्णय घेण्यात आला.

सारथी प्रशासनासाठी आवश्यक असणारी पदे तात्काळ भरण्याचे निर्देश यावेळी उपमुख्यमंत्री यांनी दिले. तसेच, तारादूत प्रकल्प लवकरात लवकर सुरू करण्यासंबंधी आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले. याचबरोबर, सारथीच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज स्मृतीग्रंथाची छपाई करून त्याचे तात्काळ वितरण करण्याबाबत सूचना देण्यात आल्या. तसेच १००० कोटी रूपयांच्या निधीबाबत मा. मुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीत बैठक घेऊन अंतिम निर्णय घेण्यात येईल असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

छत्रपती संभाजीराजे यांच्या सूचनांनुसार सारथीसंबंधी इतर प्रलंबित विषय त्वरीत मार्गी लावून तळागाळातील मराठा समाजासाठी सारथी संस्था पूर्ण क्षमतेने कार्यान्वीत करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री पवार यांनी या बैठकीत दिल्या.

Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: Ajit Pawar maratha morcha Sambhajiraje Chhatrapati sarthi Sarthi organisation