कोल्हापूर | मुंबई-गोवा महामार्गावरील वागदे डंगळवाडी (सिंधुदुर्ग) येथे झालेल्या अपघातात कोल्हापूरचा सुकुमार देवाप्पा चौगुले हा तरूण जागीच ठार झाला. दुभाजकावर कार आदळल्याने हा अपघात झाला असून अपघातात दोघे जण किरकोळ जखमी झालेत. हा अपघात आज (मंगळवार) सकाळच्या सुमारास झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोव्याहून तवेरा कार कोल्हापूरच्या दिशेने येत होती. त्यावेळी वागदे डंगळवाडी येथे चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याच्या दुभाजकावर जाऊन जोरात आदळली. यात सुकुमार देवाप्पा चौगुले (वय २९, रा.मार्केट यार्ड, कोल्हापूर) हा तरुण जागीच ठार झाला. जखमींना रूग्णालयात दाखल केले आहे. एएसआय विनायक चव्हाण यांनी घटनास्थळी जाऊन प्राथमिक पंचनामा केला. मृत चौगुले याचा मृतदेह कणकवली उपजिल्हा रुग्णालयात उत्तर तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे.