मुंबई | राज्यातील ठाकरे सरकार कोसळण्याच्या चर्चा सुरु असताना पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आपल्या ट्विटरवरुन मंत्रिपदाचा उल्लेख हटवला आहे. आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवरुन बायो हटवल्यानंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.

एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे जवळपास ३२ ते ३५ आमदार आहेत. शिवसेना आमदारांना घेऊन एकनाथ शिंदे आसामच्या गुवाहटीमध्ये पोहोचले आहेत. एकनाथ शिंदे यांनी काल ट्विट करुन मी बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचा हिंदुत्वाचा विचार सोडला नसल्याचं म्हटलं आहे. आता आदित्य ठाकरे (@AUThackeray) यांनी मंत्रिपदाचा उल्लेख हटवला असला तरी एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या ट्विटरवरुन शिवसेनेचा उल्लेख हटवलेला नाही.

@AUThackeray

काल एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या काही आमदारांसह सूरतमध्ये पोहोचले. तेथील ले मेरिडियन हॉटेलमध्ये एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे जवळपास ३५ आमदार होते. त्यानंतर एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना फोन करुन काँग्रेस-राष्ट्रवादीची साथ सोडून भाजपसोबत सरकार स्थापन करण्याची ऑफर दिली.

मुख्यमंत्र्यांनी मिलिंद नार्वेकर, रवींद्र फाटक यांना चर्चा करण्यासाठी सूरतला पाठवलं. मात्र ही चर्चा निष्फळ ठरली. त्यानंतर रात्री एकनाथ शिंदेसह सर्व आमदारांना एअरलिफ्ट करुन आसामच्या गुवाहाटीत नेण्यात आलं. त्यानंतर पहिल्यांदा एकनाथ शिंदे यांनी माध्यमांपुढे येत आपली भूमिका स्पष्ट केली. आम्ही शिवसेना सोडलेली नाही, सोडणारही नाही. बाळासाहेबांचा हिंदुत्वाचा विचार घेऊन पुढे जाणार, असं ते म्हणाले होते.

संजय राऊत म्हणतात, ‘फार तर फार काय होईल आमची सत्ता जाईल ना?’
या सर्व घडामोडीवर प्रतिक्रिया देताना मुंबईत संजय राऊत म्हणाले की, ‘सध्या सुरु असलेल्या राजकीय घडामोडींमुळे जास्तीत जास्त काय होईल, आमची सत्ता जाईल ना? सत्ता ही परत मिळवता येईल. पण पक्षाची प्रतिष्ठा ही आमच्यासाठी सर्वोच्च आहे. एकनाथ शिंदे हे सध्या आमच्यापासून लांब आहेत, ते जवळ आल्यावर आम्ही त्यांच्याशी बोलू. एकनाथ शिंदे हे माझे फक्त सहकारी नव्हे तर मित्रही आहेत. आम्ही गेली ३५-४० वर्षे एकत्र काम करतोय. उद्धव ठाकरे यांच्याशीही त्यांचे असेच नाते आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबतचे आमदार प्रथम सूरत आणि आता गुवाहाटीमध्ये गेले आहेत. आमदारांनी पर्यटन करणे ही चांगली गोष्ट आहे. पण ते परत येतील, असा विश्वासही संजय राऊत यांनी व्यक्त केला.