मुंबई । लोककल्याणकारी राजे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त काल (६ मे) कधीकाळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून मिरवलेले आणि सध्या सत्ता गेल्याने सैरभैर झालेले माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या पोस्टमुळे मोठा वाद निर्माण झाला होता. फडणवीस यांनी आपल्या पोस्टमध्ये छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचा उल्लेख चक्क ‘सामाजिक कार्यकर्ते’ असा केला होता. फडणवीसांनी मुर्खपणाचा कळस गाठत केलेल्या या पोस्टमुळे सोशल मीडियात त्यांची चांगलीच छी-थू धुलाई झाली होती.
सोशल मीडियावर #ShameOnYouFadnavis हा हॅशटॅग देखील ट्रेंड होत होता. त्यानंतर फडणवीस यांनी जुनी पोस्ट डिलीट करून नवी पोस्ट टाकली. झालेल्या प्रकारावर फडणवीसानी माफी मागण्याची साधी तसदी न घेता केवळ पोस्ट डिलीट करून दुसरी पोस्ट करत मुर्खपणाची पातळी ओलांडली होती. त्यामुळे संपूर्ण प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर संभाजीराजे छत्रपती यांनी आज (७ मे) “देवेंद्र फडणवीस यांनी कालच्या प्रकारावर सर्व शिव-शाहू भक्तांची माफी मागावी”, असे ट्विट केले. संभाजीराजे छत्रपतींच्या पोस्टमुळे अखेर फडणवीसांनी आता आपला माफीनामा दिला आहे.
“छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृतिदिनी केलेल्या ट्विटमध्ये चूक झाल्याचे लक्षात येताच लगेच मी ते ऑफिसला दुरुस्त करण्यास सांगितले. शाहू महाराज यांचा अनादर करण्याचे कधी माझ्या मनात सुद्धा येऊ शकत नाही. तथापि यामुळे भावना दुखावल्या गेल्यात. सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो”, असे ट्विट देवेंद्र फडणवीस यानी संभाजीराजे छत्रपती यांच्या मागणीनंतर केले आहे.
संभाजीराजे छत्रपती यांनी यासंदर्भात आणखी एक पोस्ट केली आहे. “छत्रपतीं विषयी जेंव्हा केंव्हा एखादं प्रकरण समोर आलं, तेंव्हा सर्वात आधी मी भूमिका घेतली आहे. प्रत्येक वेळी मी पुढे असतो, यापुढेही असेन. शिवरायांची तुलना नरेंद्र मोदींसोबत जेंव्हा केली गेली तेंव्हा देशात सर्वात आधी मी बोललो होतो. सिंदखेड राजा मधील माझ्या चालू भाषणात जेंव्हा मला हे कळलं तेंव्हा तात्काळ या घटनेचा जाहीर निषेध मी केला होता. केंद्रीय मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी महाराजांचा एकेरी उल्लेख केला तेंव्हा मी त्यांना माफी मागायला भाग पाडलं होतं. मग इतरांचं काय घेऊन बसलाय?”, असे संभाजीराजेंनी या पोस्टमध्ये लिहिले आहे.
फडणवीस यांच्या कालच्या ट्विटनंतर नेटिझन्सकडून मोठी टीका झाली. “शाहू महाराज हे राजे होते, ते छत्रपती होते, त्यांनी समाजसुधारणेचा आणि समाज प्रबोधनाचा पाया रचला मात्र म्हणून त्यांचा उल्लेख सामाजिक कार्यकर्ते असा करणे हा त्यांचा अपमान आहे. फडणवीसांनी याबाबत माफी मागावी”, अशी टीका या पोस्टवर झाली. मात्र, त्यानंतर फडणवीस यांनी केवळ जुने ट्विट डिलीट केले. मात्र, माफी मागितली नव्हती. फडणवीस यांनी ही आपली जुनी वादात सापडलेली पोस्ट डिलीट केल्यानंतर लगेचच एक नवी पोस्ट अपलोड केली. या नव्या पोस्टमध्ये छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचा उल्लेख “सामाजिक क्रांतीचे जनक वंचितांचे शिक्षण, हक्कांचा पुरस्कार करणारे छत्रपती राजर्षि शाहू महाराज यांना स्मृतिदिनी शत शत नमन!” असा करण्यात आला.