mahalaxmi express_Vishwjeet
मुंबई।२७ जुलै। महालक्ष्मी एक्सप्रेस वांगणी येथे पुराच्या पाण्यात अडकल्यानंतर रेल्वेतील सर्वांच्याच तोंडचे पाणी पळाले. मात्र यात कोल्हापूरसाठी प्रवास करणारा एक तरूण असा होता, ज्याने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून सोशल मिडियाचा प्रभावी वापर करत रेल्वेतील सत्य परिस्थितीचे चित्रण प्रशासन व पत्रकार यांच्या पर्यंत पोहचविले. यामुळे रेल्वे प्रशासन, एनडीआरएफ टीम, देशभरातील विविध वृत्तवाहिन्या, दैनिके यांना मोलाची माहिती उपलब्ध होण्यास मदत झाली.
विश्वजीत रावसाहेब भोसले असे नाव असलेला हा तरूण मुळचा कोल्हापूर जिल्ह्यातील असून महावितरणमध्ये जनसंपर्क अधिकारी पदावर कार्यरत आहे. शनिवार रविवारची सुट्टी असल्याने विश्वजीत महालक्ष्मी एक्सप्रेसमधून कोल्हापूरला येत होता. या तरूण अधिकाऱ्याने आपल्या जनसंपर्क कौशल्याचा पुरेपुर वापर करत रेल्वेच्या बोगीतील प्रवासांशी संपर्क साधण्यास सुरवात केली. प्रवाशांची माहिती घेत, गरजेनुसार फोटो आणि व्हिडीओ चित्रण करून ते सोशल मिडीयावर पाठवले. यातील सर्वच व्हिडीओ, रेल्वेतील प्रवाशांच्या मुलाखती आणि फोटो देशभरातील विविध वृत्तवाहिन्या आणि विविध माध्यमांनी दिवसभराच्या बातम्यांसाठी वापरल्या.
विश्वजीत भोसले यांच्या या कामगिरीमुळे विविध मिडीया हाऊसेसना महालक्ष्मी एक्सप्रेस मधील बातम्यांची सत्य परिस्थीती लोकांपर्यत पोहचवण्यास मदत झाली. त्यामुळे अशा परिस्थितीत सोशल मिडीयावरून पसरवल्या जाणाऱ्या अफवांना पायबंद बसला. तसेच ज्या प्रवाशांचे कुटूंबिय या सर्व प्रसंगानी घाबरून गेले होते त्यांना दिलासा मिळण्यास देखील मदत झाली.
विश्वजीत भोसले यांनी जागरूक नागरिक म्हणून प्रसंगावधान राखत केलेल्या कामगिरीमुळे महालक्ष्मी एक्सप्रेस मध्ये अडकून पडलेल्या हजारो प्रवाशांच्या कुटूंबियाना माहिती उपलब्ध होण्यास मदत झाली. दरम्यान एनडीआरएफ व नौदलाच्या जवानांनी स्थानिकांच्या मदतीने प्रवाशांना सुखरूप बाहेर काढून बचावकार्य पूर्ण केले. बचावकार्य पूर्ण झाल्यानंतर प्रवाशांच्या पुढील प्रवासाच्या सोयीसाठी एसटी महामंडळ मदतीस धावून आले. बदलापूर ते कल्याण या मार्गावर १५ एसटी गाड्यांमधून रेल्वे प्रवाशांना कल्याण रेल्वे स्टेशन पर्यंत नेण्यात आले.
त्यानंतर रेल्वे प्रशासनाने कोल्हापूर पर्यंत जाणाऱ्या प्रवाशांसाठी विशेष रेल्वेची सोय केली. तसेच रेल्वेत चहा नाष्ट्याची मोफत सोय करून प्रवाशांना सुखरूप पोहचवण्याचीही हमी घेतली. या एकूणच प्रवासात विश्वजीत भोसले यांनी केलेल्या कामगिरीमुळे त्यांच्यावर विविध स्तरातून कौतुकाचा वर्षाव सुरू आहे.