मुंबई | भारतीय सैन्यदलात (Indian Army Jobs) जवानांची असलेली कमतरता आणि परकीय आक्रमणाचा संभाव्य धोका लक्षात घेता केंद्र सरकारने एक नव्या योजनेची (Scheme) घोषणा केली आहे. या योजनेनुसार, युवकांना सैन्यदलात चार वर्षं काम करण्याची संधी मिळणार आहे. त्यांना अग्निवीर असं संबोधलं जाणार आहे. या योजनेअंतर्गत 50 हजार अग्निवीरांची (Agni vir) निवड केली जाणार आहे. मंगळवारी (14 जून) संरक्षणमंत्री राजनाथसिंह (Defense Minister Rajnath Singh) यांनी अग्निपथ (Agneepath) या महत्त्वपूर्ण योजनेची घोषणा केली आहे.

भारतीय सैन्यदलात जवळपास दीड लाख जवानांची कमतरता भासत आहे. दरमहा पाच हजार सैनिक निवृत्त होतात. त्यामुळे ही तूट आणखीच वाढत असल्याने यावर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकार सैन्य भरतीबाबत नवी योजना जाहीर करण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मंगळवारी दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनी सैन्य भरतीबाबत महत्त्वपूर्ण अशा अग्निपथ योजनेची घोषणा केली. या वेळी तिन्ही सैन्यदलांचे प्रमुखही उपस्थित होते.

या योजनेंतर्गत हजारो तरुणांना सैन्यात काम करण्याची संधी मिळणार आहे. तसंच त्यासाठी त्यांना आर्थिक मोबदलाही दिला जाणार आहे. त्याचप्रमाणे चार वर्षांच्या सेवेनंतरही अशा युवकांना सुविधांचा लाभ दिला जाईल, असं यावेळी राजनाथ सिंह यांनी यावेळी स्पष्ट केलं.

या योजनेतून निवड झालेल्या जवानांपैकी 80 टक्के जवानांना चार वर्षांनंतर कार्यमुक्त केलं जाईल तर सर्वोत्कृष्ट 20 टक्के जवानांना तिन्ही सैन्यदलांमध्ये कायम केलं जाईल.

सध्या भारताच्या सैन्याचं सरासरी वय 35 वर्षं आहे. आता या नव्या योजनेमुळे ते सरासरी वय 25 वर्षांवर आणण्यास मदत होणार आहे. सैन्याचं सरासरी वय जितकं कमी, तितकं ते सैन्य बलवान समजलं जातं. सरकारने ही योजना लागू करताना अशा प्रकारची योजना आधीच लागू असलेल्या 8 देशांमधल्या योजनांचा अभ्यास केला आहे. या योजनेला टूर ऑफ ड्युटी (Tour of Duty) असंही म्हटलं जातं.

तत्कालीन चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत (CDC Bipin Rawat) यांनी अग्निपथ योजनेची संकल्पना मांडली होती. रावत यांच्या मृत्यूनंतर ही योजना आता सत्यात उतरवली जाणार आहे. जवानांची कमतरता भासू नये, सैन्याचा पेन्शनवरचा खर्च कमी करावा आणि तरुणांना सैन्यात भरती होण्यासाठी प्रोत्साहित करावं, असे या संकल्पनेमागचे उद्देश होते. या योजनेची ब्लू प्रिंट (Blue Print) 2020 मध्ये तयार करण्यात आली होती. अखेर आज या योजनेची घोषणा झाली असून, या माध्यमातून युवकांना देशसेवेची संधी उपलब्ध होणार आहे.

अधिकृत आकडेवारीनुसार, भारतीय सैन्यात 1.2 दशलक्ष जवान कार्यरत आहेत. कोरोना महामारी सुरू होण्यापूर्वी दर वर्षी सैन्यभरती केली जात होती. 2018-19 मध्ये 53,431, तर 2019-20 मध्ये 80,572 जवानांची भरती करण्यात आली होती. परंतु, जवानांची अपुरी संख्या आणि परकीय आक्रमणाचा संभाव्य धोका लक्षात घेता अग्निपथ योजनेंतर्गत सैन्यभरती करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला.