मुंबई | शेतकरी वर्गात प्रसिध्द असणाऱ्या कृषि यांत्रिकीकरण योजनेचा लाभ देण्यासाठी शासनाने ही योजना पुन्हा कार्यान्वित केली आहे. यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन केले आहे. ज्या शेतकऱ्यांनी यापूर्वी अर्ज केलेले आहेत अशा शेतकऱ्यांचे सर्व अर्ज रद्द करण्यात आले असून या सर्व शेतकऱ्यांनीही नव्याने ऑनलाइन पोर्टल वर अर्ज करावेत असे सांगण्यात आले आहे.
या योजनेच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना ट्रॅक्टर व ट्रॅक्टर चलीत औजारे जसे की, रोटावेटर, पेरणी यंत्र, मळणी यंत्र, हायड्रॉलिक पलटी नांगर, कापणी यंत्र, ऊस पाचट कुटी यंत्र, फवारणी यंत्र, तसेच पॉवर टिलर, वीडर, रिपर, कापणी यंत्र यासारखी यंत्रे अनुदानावर खरेदी करता येणार आहेत. यासाठी शेतकऱ्यांनी महाराष्ट्र शासनाच्या mahadbtmahait.gov.in पोर्टल वर ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे गरजेचे आहे.
अर्ज करताना ही कागदपत्रे ठेवा सोबत –
7/12 व 8 अ उतारा, आधार कार्ड, बँक पासबुक, ट्रॅक्टर RC बुक, जातीचा दाखला (असल्यास), मोबाईल (OTP साठी) इत्यादी.
लाभार्थी निवड पध्दत –
ऑनलाईन अर्ज केलेल्या अर्जदारांची निवड लकी ड्रॉ /सोडत पद्धतीने करण्यात येणार आहे.
अर्ज कुठे कराल –
शेतकरी बांधवांनी ऑनलाइन पोर्टल वर अर्ज भरण्यासाठी आपल्या गावातील सी.एस.सी सेंटर ला भेट द्यावी. कोरोनामुळे सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे पालन करून अर्ज भरावेत. ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर अर्ज भरल्याची पावती जपून ठेवावी असे आवाहन कृषि विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.