अकोले। पद्मश्री राहीबाई पोपेरे यांच्या कामाची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिली जाईल. तसेच शासनाकडून पद्मश्री राहीबाई पोपेरे यांचे काम राज्यभर पोहचविण्याचे काम सरकार करेल, अशी ग्वाही कृषिमंत्री दादा भुसे यांनी दिली. ते शिवजयंती कार्यक्रमाच्या निमित्ताने अकोले तालुक्यातील कोंभाळणे या गावात आले होते. यावेळी त्यांनी पद्मश्री राहीबाई पोपेरे यांच्या बिजशाळेला भेट देवून त्यांचा सत्कार केला.
‘माझी माय पण मातीच्या भांड्यात बियाणे साठवूण ठेवायची. तुमचं काम पाहून मला आईची आठवण झाली’, अशी भावना कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी ‘बीजमाता’ राहीबाई पोपेरे यांच्याजवळ व्यक्त केली. राहीबाई यांनी जुनी परंपरा पुनर्जीवित केली आहे. ते काम राज्यातील शेतकऱ्यांपर्यंत, गाव-वाडी पर्यंत पोहोचविण्यासाठी कृषी विभाग सहकार्य करील. मानवी आरोग्यासाठी उपयुक्त असलेल्या स्थानिक वाणांच्या संवर्धनाला चालना देतानाच त्याच्या बिजोत्पादनासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले जाईल, असे कृषीमंत्री भुसे यांनी सांगितले.
राहीबाईंनी भाजीपाला, भात, गहू, बाजरी, कडधान्ये पिकांच्या ११२ प्रकारचे वाण जतन करून ठेवले आहेत. त्यांनी महिला शेतकऱ्यांचा गट स्थापन करून त्या माध्यमातून जुन्या वाणांचे बिजोत्पादन केले जाते. आतापर्यंत सुमारे एक लाख लोकांनी त्यांनी तयार केलेले बियाणे त्यांच्याकडून नेले आहे. देशभरातून कृषी तंत्रज्ञान शिकणारे अनेक विद्यार्थी त्यांचा हा प्रकल्प बघायला येतात.
यावेळी सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे, माजी.जि.प.अध्यक्ष नाशिक उदय सांगळे, नाशिक विभागीय कृषी सह संचालक पडवळ, कृषी उपविभागीय अधिकारी सुधाकर बोराळे, तालुका कृषी अधिकारी प्रवीण गोसावी, अकोले शिवसेना तालुका प्रमुख मच्छिंद्र धुमाळ,शहराध्यक्ष नितिन नाईकवाडी,प्रदीप हासे, नगरसेवक प्रमोद मंडलिक बायफचे जतिन साठे उपस्थित होते. या प्रसंगी ना. दादा भुसे यांनी पद्मश्री पोपेरे यांची नविन व जुनी अशा बियाणे बँकेची पाहणी केली.