नवी दिल्ली। ‘तान्हाजी – द अनसंग वॉरियर’ हा चित्रपट सगळीकडे धुमाकुळ घालत असून सर्वच क्षेत्रातील लोकांना हा चित्रपट आवडल्याचे दिसत आहे. नुकताच हा चित्रपट भारताच्या तिन्ही सेनादल प्रमुखांनीही पाहिला असून त्यांचा एक फोटो सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. या संदर्भात चित्रपटात तानाजी मालुसरे यांची भुमिका निभावणाऱ्या अजय देवगण या अभिनेत्यानेही आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
रविवारी (१९ जानेवारी) संध्याकाळी भूदल सेना प्रमुख मनोज मुकुंद नरवणे, नौदल प्रमुख एडमिरल करमबीर सिंह आणि वायुदल प्रमुख एयर चीफ मार्शल राकेश कुमार सिंह भदौरिया यांनी नवी दिल्ली येथील चित्रपट गृहात हा चित्रपट पाहिला. यावेळी तिघांसोबत अजय देवगणही उपस्थित असल्याचे दिसून येत आहे.
यानंतर नौदलाचे पूर्वअधिकारी हरिंदर सिक्का यांनी सेनादल प्रमुख आणि अजय देवगण यासर्वांसोबत काढलेला एक फोटो सोशल मिडीयावर अपलोड केला असून यावर अजय देवगण यानेही प्रतिक्रिया दिल्याचे दिसून येत आहे.
अजय देवगण याचा हा १०० वा चित्रपट असून मराठा सरदार तानाजी मालुसरे यांच्या शौर्याची गाथा मांडण्यात आली आहे. चित्रपटात तानाजी मालूसरे यांची भूमिका अजय देवगण यांनी निभावली असून त्यांच्या पत्नी सावित्रीबाई मालुसरे यांची भूमिका अजय देवगण यांची पत्नी काजोलने निभावली आहे. चित्रपटात शिवाजी महाराजांची भूमिका अभिनेता शरद केळकर तर उदयभान राठोडची भूमिका अभिनेता सैफअली खान याने केली आहे.