Categories: राजकीय

बारा हजार कोटींच्या ठेवी असणाऱ्या बॅंकेत २५ हजार कोटींचा घोटाळा कसा करू शकतो? पत्रकार बैठकीत अजित पवारांचा सवाल

मुंबई।२८ सप्टेंबर। शरद पवार आणि राष्ट्रवादीला नेस्तनाबूत करण्यासाठी सरकारकडून सुरू असलेले षढयंत्र पाहून उद्विग्न झाल्याने आपण भावूक होऊन तडकाफडकी राजीनामा दिल्याचे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे. नुकतीच त्यांनी पत्रकार बैठकीत आपल्या राजीनाम्याबद्दलची भुमिका स्पष्ट केली. 

यावेळी अजित पवार यांनी, “ज्या बॅंकेच्या ठेवी १२ हजार कोटींच्या आसपास आहेत, अशा बॅंकेत २५ हजार कोटींचा भ्रष्टाचार कसा होऊ शकतो असा सवाल त्यांनी उपस्थित केला”. ज्या बॅंका, संस्थांची मर्यादाच तेवढी नाही त्याठिकाणी त्यापेक्षा अधिक पटीने भ्रष्टाचार केला हे जनतेला सांगून आम्हाला बदनाम केले जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

राज्य बॅंकेशी शरद पवार यांचा काडीचाही संबंध नसताना त्यांचे नाव यात गोवण्यात आले. जसा मी संचालक आहे, तसेच भाजपाचे देखील १७ संचाल क या बॅंकेत आहेत. पण टार्गेट फक्त अजित पवारच का? असे म्हणत त्यांनी पत्रकारांनाच या षढयंत्रामागील सत्य बाहेर काढून जनतेसमोर मांडण्याचे आवाहन केले.

बिनबुडाचे आरोप किती करावे, चौकशी किती मर्यादेपर्यंत करावी, किती दिवस करावी याला काही मर्यादाच ठेवली जात नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. त्याचबरोबर कुटूंबात कोणताही कलह नसल्याचे सांगत त्यांनी जे पक्ष सोडून गेले त्यांना आपल्याशी जोडून ठेवण्यात कुठेतरी आम्ही कमी पडलो याची खंत मात्र यावेळी व्यक्त केली. 

Team Lokshahi News