Categories: राजकीय

अजित पवारांचा तडकाफडकी राजीनामा; राजकीय चर्चांना उधाण

मुंबई। २७ सप्टेंबर। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज आपला आमदारकीचा राजीनामा देऊन राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. त्यांनी आपला राजीनामा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे दिला असून त्यांनी तो मंजूरही केला आहे. 

दरम्यान अजितदादा पवार यांनी राजीनामा का दिलाय हे स्पष्ट झाले नसल्याने राजकीय वर्तुळात मात्र चर्चांना उधाण आल्याचे दिसून आलयं.  यासंदर्भात हरीभाऊ बागडे यांनी माध्यमांशी फोनवरून बोलताना,  ‘माझ्या विधानसभा मतदारसंघाचा राजीनामा मी देत आहे असा अजित पवार यांनी स्वतःहून फोन केला, म्हणून मी तो मंजूर केला असं सांगितले.” तसेच कुठलंही कारण त्यांनी दिलेले नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. 

अजित पवार यांचं नाव शिखर बँक घोटाळा प्रकरणात पुढे आलं होतं. त्यांच्यासह ७० जणांची नावं २५ हजार कोटींच्या घोटाळ्यात समोर आली होती. ज्यामध्ये शरद पवार यांचंही नाव होतं. आज दिवसभर शरद पवार हे ईडीच्या कार्यालयात हजेरी लावणार ही बातमी चर्चेत होती. मात्र कायदा सुव्यवस्थेचं कारण सांगत शरद पवार यांनी ईडी कार्यालयात जाणार नसल्याचं स्पष्ट केलं.

अजित पवार हे राज्य शिखर बँकेच्या संचालक मंडळावर होते. या घोटाळ्यामध्ये शरद पवारांचा संबंध असू शकत नाही कारण ते ना संचालक होते, ना सभासद होते असे सर्वांनीच स्पष्ट केले होते. मात्र कुणीही अजित पवार  यांच्यासंदर्भात स्पष्टीकरण दिले नव्हते. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या राजीनाम्यामुळे खळबळ उडाली आहे.

Team Lokshahi News