Categories: राजकीय सामाजिक

मराठा आरक्षणप्रश्नी महाराष्ट्रातील सर्वपक्षीय खासदार घेणार पंतप्रधानांची भेट

कोल्हापूर | मराठा आरक्षण प्रकरणी महाराष्ट्रातील सर्वपक्षीय खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खासदरा संभाजीराजे छत्रपती यांच्या अध्यक्षतेखाली भेट घेणार आहेत. याबाबत शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक यांनी खासदार संभाजीराजे छत्रपती यांची दिल्ली येथे भेट घेवून मराठा आरक्षणाबाबतच्या पाठिंब्याचे पत्र सुपूर्द केले आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात केंद्र सरकारने लक्ष घालून त्यावर तातडीने निर्णय द्यावा याकरीता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली जाणार असून मोदींच्या भेटीची वेळ मागण्यात आली आहे.

याबाबत, खासदार संजय मंडलिक यांनी प्रसिध्दीपत्रक दिले असून यामध्ये त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे मराठा समाजाच्या ज्या भावना आहेत त्या व्यक्तीश: माझ्या व राज्य शासनाच्या आहेत असे स्पष्ट केले आहे. मराठा समाजास आरक्षण लागू करण्याचा कायदा संमत झाला त्यामागे सर्वपक्षासह मराठा समाज आणि मराठा समाजाच्या संघटनांची एकसंघ ताकद होती. मा.उच्च न्यायालयातही मराठा समाजाचा विजय झाला होता.  तरीसुद्धा, सर्वोच्च न्यायालयाने एकीकडे राज्य सरकारचे आरक्षण प्रकरण घटनापीठाकडे पाठविण्याचे म्हणणे मान्य केले तर दुसरीकडे त्याला अंतरिम स्थगिती दिली आहे.

तामिळनाडूतील अशाच आरक्षण प्रकरणाचा खटला घटनापीठाकडे वर्ग करताना तेथील आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिलेली नव्हती. त्यामुळे, सर्वोच्च न्यायालयाचा मराठा आरक्षणास स्थगिती देण्याचा निकाल धक्कादायक व दुर्देवी असल्याचेही त्यांनी म्हणटले आहे.  

Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: maratha aarkshan