मुंबई | सध्या सोशल मीडियावर गाजत असलेल्या अमृता फडणवीस यांच्या ‘तिला जगू द्या’ गाण्याचे काँग्रेसच्या नेत्या आणि मंत्री यशोमती ठाकूर यांनी कौतुक केले आहे. सध्या विविध कारणांमुळे अमृता फडणवीस यांचे गाणे व्हायरल होत आहे. गाण्याचा आशय छान आहे. मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी जनजागृती महत्वाची आहे. त्यासाठी माझ्या शुभेच्छा, असे यशोमती ठाकूर यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचे गायनकौशल्य संपूर्ण राज्याला परिचित आहे. त्यांच्या गायनकौशल्याची वारंवार खिल्ली उडवली जाते. त्यामुळे कोणत्या कोणत्या कारणानी त्यांची गाणी सोशल मीडियावर हिट ठरली आहेत. नुकतेच अमृता फडणवीस यांनी भाऊबीजेनिमित्त एक नवे गाणे रिलीज केले होते. टी सिरीजने १४ नोव्हेंबर रोजी प्रसारित केलेल्या या गाण्याला अवघ्या पाच दिवसात १.४ मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. तर तब्बल लाईक पेक्षा डिसलाईकची संख्याही अधिक आहे. पाच दिवसात ४१ हजार हून अधिक डिसलाईकही मिळाले आहेत.
‘तिला जगू द्या’ या गाण्याच्या माध्यमातून स्त्री शिक्षण आणि सबलीकरणाचा संदेश देण्यात आला आहे. या गाण्यामध्ये अमृता फडणवीस यांनी त्यांचा आणि त्यांच्या मुलीचाही फोटो वापरण्यात आला आहे.