Categories: सामाजिक

ग्रामीण भागातील बेघरांसाठी राज्य सरकारने घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय

मुंबई | ग्रामीण गृहनिर्माणला चालना देण्यासाठी ग्रामविकास विभागामार्फत पुढील शंभर दिवसात ८ लाख ८२ हजार १३५ घरकुलांची निर्मिती करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. सर्वांनी एकत्रित सहभागातून हे अभियान यशस्वी करावे, असे आवाहन मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले. सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे राज्यस्तरीय कार्यशाळेत या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. 

मुख्यमंत्री ठाकरे पुढे म्हणाले, घरकुले बांधताना ती पक्की आणि मजबूत बांधली जातील याबाबत सर्वांनी दक्षता घ्यावी. इतर राज्यातील लोकांनी येऊन आपली घरकुले बघितली पाहिजेत, अशा प्रकारच्या आदर्श आणि सुंदर घरांची निर्मिती करण्यात यावी. महाआवास योजनेची आखणी चांगल्या प्रकारे करण्यात आली आहे. फक्त अनुदान देऊन न थांबता त्याबरोबर शौचालय, जागा नसल्यास घरकुलासाठी जमीन, बँकेचे कर्ज असे संपूर्ण पॅकेज लाभार्थ्यास देण्यात येत आहे. ही योजना निश्चितच यशस्वी ठरेल. ग्रामीण घरकुल योजनांसाठी कोणत्याही प्रकारे निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही, असेही ठाकरे यांनी सांगितले.

यावेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले की, पुढील शंभर दिवसात सुमारे ८ लाख ८२ हजार घरांची निर्मिती करण्याचा संकल्प ग्रामविकास विभागाने केला आहे. यासाठी सुमारे ४ हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. घरकुलासाठी ज्यांना जागा नाही त्यांना ती उपलब्ध करुन देणे, शासकीय जागांवरील निवासी अतिक्रमणे नियमित करणे अशा विविध उपाय योजनाही राबविण्यात येणार आहेत. ग्रामीण भागात एकही कुटुंब घरकुलाशिवाय राहणार नाही याअनुषंगाने अभियानाची प्रभावी अंमलबजावणी केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले की, ग्रामीण भागात पायाभूत सुविधा निर्मितीस गती देण्यात आली आहे. आता शंभर दिवसात राबविल्या जाणाऱ्या महाआवास अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करुन प्रत्येक बेघरांस घर मिळेल या पद्धतीने नियोजन केले जाईल. या अभियानातून ग्रामीण बेघर, गोरगरीब यांना मोठा दिलासा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: gharkul yojana maharashtra 2020 list gram panchayat gharkul yojana maharashtra mahaawas yojana pm awas yojana maharashtra list 2020 pradhan mantri awas yojana gramin pradhan mantri awas yojana in maharashtra in marathi pradhan mantri awas yojana list 2020 pradhan mantri awas yojana maharashtra list 2019 pradhan mantri awas yojana maharashtra list 2020