Categories: कृषी तंत्रज्ञान

भारतीय शेतकऱ्याचा ‘हा’ अनोखा जुगाड पाहून आनंद महिंद्राही म्हणाले…

भारतीय शेतकरी शेती करताना उपलब्ध तंत्रज्ञानाच्या सहाय्याने जुगाड करून शेतीची विविध कामे कशी सोप्या पध्दतीने करता येतील हे पहात असतात. अशा शेतकऱ्यांची आपल्याकडे अजिबात कमी नसून त्यांनी केलेले जुगाड मात्र अत्याधुनिक तंत्रज्ञानालाही लाजवतील असेच असल्याचे दिसून येते. यातून शेतकऱ्यांची कल्पकवृत्ती आणि नाविन्याचा ध्यास देखील दिसून येतो. अशाच एका शेतकऱ्याच्या जुगाडाचा व्हिडीओ प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे. महिंद्रा यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये, एका शेतकऱ्यांने मका सोलण्यासाठी चक्क दुचाकीचा वापर केला असून ही गाडी मधल्या स्टँडवर लावण्यात आली आहे. ही गाडी चालू अवस्थेत ठेवून पाठीमागच्या फिरणाऱ्या चाकाच्या सहाय्याने अगदी सहजरित्या मक्याची कणसे सोलण्याचे काम केले जात आहे.

या व्हिडीओत, दुचाकीचे मागचे टायर एका मशिनसारखे काम करताना दिसत आहे. आनंद महिंद्रा यांनी हा व्हिडीओ ट्विट करून असे लिहिले आहे की असे व्हिडिओ माझ्या लक्षात येत असतात. ज्यामध्ये शेतकरी त्यांच्या कल्पकतेने बाईक आणि ट्रॅक्टर मल्टी-टास्किंग मशीनमध्ये बदलताना पाहिले आहेत. मी माझ्या स्वप्नातही याचा वापर करण्याचा विचार केला नसता. 
दरम्यान, आनंद महिंद्रा यांनी ट्विट केलेल्या या व्हिडीओनंतर त्यांना प्रतिक्रिया देताना अशाच एका सहज सोप्या टेक्निकचा व्हिडीओ एका युजरने शेअर केला असून त्यामध्येही अगदी सोप्या रितीने मक्याचे दाणे सोलण्याचे काम केले जात असल्याचे दिसत आहे. 

Team Lokshahi News