पन्हाळा। आणखी दोन दिवसात त्याला क्वारंटाईन मधून घरी परतण्याचे वेध लागले होते. आई, वडील, भाऊ बहिण यांच्याबरोबर पुन्हा त्याला एकत्र रहायला मिळणार होते… परंतु अचानक एक कळ आली आणि अवघ्या क्षणात होत्याचं नव्हतं झालं… आणि कोरोनाच्या धास्तीने व कुटूंबियांच्या ओढीने गावी परतलेल्या तरूणाचे घरी परतण्याचं स्वप्न शेवटी अधुरंच राहिलं…!
ही हृदयद्रावक घटना घडलीय पन्हाळा तालुक्यातील आकुर्डे येथे मराठी शाळेत क्वारंटाईन करण्यात आलेल्या एका तरूणासोबत. या तरूणाचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यु झालाय. अवघ्या २८ वर्षाच्या तरूणाचा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर क्वारंटाईन दरम्यान मृत्यु झाल्याने तालुक्यात खळबळ उडालीय. पृथ्वीराज सरदार पाटील असे या तरूणाचे नाव असून तो पुणे येथे नोकरीस होता.
पृथ्वीराज १६ मे रोजी पुणे येथून आकुर्डे येथे आला होता. त्याला शाळेत क्वारंटाईन करण्यात आले होते. मंगळवारी क्वारंटाईनचे ११ दिवस पूर्ण झाल्याने आणखी २-३ दिवसात त्याला घरी सोडण्यात येणार होते. परंतु मंगळवारी (२६ मे) सकाळी त्याला हृदयविकाराचा झटका आल्याने सीपीआर मध्ये दाखल करण्यात आले. दरम्यान त्याचा मृत्यु झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
घराच्या ओढीने गावी परतलेल्या पृथ्वीराजचा अशा पध्दतीने मृत्यु झाल्याने कुटूंबियांना मोठा धक्का बसला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे. पन्हाळा तालुक्यातील धामणी परिसरातील काही गावांमध्ये कोरोनाचे रूग्ण आढळल्याने परिसरात भितीचे वातावरण आहे.