Categories: बातम्या सामाजिक

बाबरी मशिदीचा विध्वंस ही उत्स्फुर्त प्रतिक्रिया; सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता!

नवी दिल्ली | बाबरी मशीद विध्वंस प्रकरणी सीबीआयच्या (CBI) विशेष कोर्टाने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. तब्बल २८ वर्षांनी हा निकाल आला आहे. १ डिसेंबर १९९२ रोजी अयोध्येत घडलेल्या विध्वंसाप्रकरणी कोर्टाने हा निर्णय दिला. या खटल्यात लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती, विनय कटियार, कल्याण सिंह यांसारख्या मोठ्या राजकीय व्यक्तींसह एकूण ३२ जण आरोपी होते. निकालाबाबत स्पष्टीकरण देताना कोर्टाने बाबरी विध्वंस ही घटना पूर्वनियोजित घटना नव्हती, ती एक उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती, असे नमूद केले आहे.

बाबरी मशिदीच्या विध्वंसाची घटना घडली त्यावेळी मोठ्या राजकीय नेत्यांनी ही हिंसा रोखण्याचाही प्रयत्न केला होता. या घटनेबाबत कोणताही पुरावा नाही. वर्तमानपत्रात ज्या काही बातम्या आल्या किंवा व्हिडीओ आले त्याचा पुरावा म्हणून वापर केला जाऊ शकत नाही. घटनेतील आरोपींविरुद्ध कोणाताही सबळ पुरावा मिळाला नसल्याचेही कोर्टाने नमूद केलं आहे. सीबीआय(CBI) च्या विशेष न्यायालयाने आज (बुधवारी ३० सप्टेंबर) हा निकाल दिला. लखनौमधील कोर्टात सकाळी ११ वाजता या निकाल वाचनाला सुरुवात झाली. या निकालाकडे संपूर्ण देशवासियांचे लक्ष लागले होते. या पार्श्वभूमीवर सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

निकालातील महत्वाचे मुद्दे
– विश्व हिंदू परिषद आणि संघाचा मशिदी पाडण्याचा कोणताही हेतू नव्हता.
– अराजक माजलेल्या संधीचा फायदा घेत काही घटकांनी दगडफेक केली.
– पुराव्याअभावी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात येत आहे.
– सीबीआयने कोर्टात पुरावा म्हणून सादर केलेला फोटो व व्हिडिओ अस्सल मानला गेला नाही.

प्रमुख आरोपींची नावे
लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, सुधीर कक्कर, सतीश प्रधान, राम चंद्र खत्री, संतोष दुबे आणि ओम प्रकाश पांडे, कल्याण सिंह, उमा भारती, रामविलास वेदांती, विनय कटियार, प्रकाश शरण, गांधी यादव, जय भानसिंग, लल्लू सिंह, कमलेश त्रिपाठी, बृजभूषण सिंह, रामजी गुप्ता, महंत नृत्य गोपाल दास, चंपत राय, साक्षी महाराज, विनय कुमार राय, नवीन भाई शुक्ला, धर्मदास, जय भगवान गोयल, अमरनाथ गोयल, साध्वी ऋतंभरा, पवन पांडे, विजय बहादुर सिंह, आरएम श्रीवास्तव आणि धर्मेंद्रसिंग गुजर

१६ व्या शतकातील अयोध्येतील वादग्रस्त रचना पाडल्याप्रकरणी ४८ जणांवर आरोप निश्चित करण्यात आले होते. या आरोपात मशीद पाडण्यासाठी आरोपींनी कारस्थान रचले आणि कारसेवकांना मशीद पाडण्यासाठी फूस लावली असा सीबीआयचा युक्तिवाद होता. २८ वर्षे चाललेल्या या प्रदीर्घ खटल्याच्या प्रक्रियेदरम्यान १६ लोकांचा मृत्यू झाला आहे. हा निकाल ऐकण्यासाठी आज ३२ पैकी २६ लोक न्यायालयात उपस्थित होते. सीबीआयने केलेल्या तपासणीत ६०० पानी कागदपत्र आणि ३५१ साक्षीदार पुरावे म्हणून सादर केले आहेत. आजचा निर्णयही जवळपास दोन हजार पानी असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Team Lokshahi News