मुंबई | स्वस्त कर्ज मिळण्याचे दिवस आता संपल्यात जमा झालेत. सर्वच बँकांनी आपल्या कर्जाच्या व्याजदरात वाढ करण्यास सुरुवात केली आहे. मे महिन्यात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रेपो (Reserve Bank of India) दरात (Repo Rate) वाढ केल्यानंतर जवळपास सर्वच बँकांनी व्याजदर वाढवले आहेत. आता पुन्हा एकदा RBI रेपो दरात वाढ करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र रिझर्व्ह बँकेच्या घोषणेआधीच बँकांनी व्याजदर आणखी वाढवण्यास सुरुवात केली आहे. आजपासून तीन बँकांनी आपल्या व्याजदरात वाढ केली आहे.

आज तक वृत्तसमूहाने दिलेल्या बातमीनुसार, कॅनरा बँक (Canara Bank), एचडीएफसी बँक (HDFC Bank) आणि करूर वैश्य बँकेने (Karur Vysya Bank) त्यांचे व्याजदर वाढवले आहेत. कॅनरा बँकेने सांगितले की, नवे व्याजदर 7 जूनपासून लागू होणार आहेत. कॅनरा बँकेने मार्जिन कॉस्ट ऑफ लेंडिंग रेट (MCLR) मध्ये 0.05 टक्क्यांनी वाढ केली आहे. करूर वैश्य बँकेने बेंचमार्क प्राइम लेंडिंग रेट (BPLR) 0.40 टक्क्यांनी वाढवले आहेत. HDFC ने देखील MCLR 0.35 टक्क्यांनी वाढवला आहे.

HDFC बँकेने ओव्हरनाईट कर्जासाठीचा MCLR 7.15 टक्क्यांवरून 7.50 टक्क्यांपर्यंत वाढवला आहे. एक महिन्याच्या कर्जाचा व्याजदर 7.20 टक्क्यांवरून 7.55 टक्के करण्यात आला आहे. या वाढीनंतर, तीन आणि सहा महिन्यांच्या कर्जासाठी एमसीएलआर अनुक्रमे 7.60 टक्के, 7.70 टक्के वाढला आहे. त्याच वेळी, एक वर्षासाठी कर्ज 7.85 टक्के दराने उपलब्ध असेल. दोन वर्ष आणि तीन वर्षांच्या कर्जासाठी व्याजदर 7.95 टक्के आणि 8.05 टक्के झाला आहे

आरबीआयच्या चलनविषयक धोरण समितीची तीन दिवसीय बैठक संपण्यापूर्वीच बँकांनी व्याजदरात वाढ केली आहे. या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. RBI च्या या बैठकीत रेपो दरात 35 ते 40 बेसिस पॉइंट्सने वाढ करण्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.