Categories: Featured गुन्हे

किणी टोलनाक्याजवळ पोलिस आणि गुंडामध्ये धुमश्चक्री, गोळीबारात गुंड गंभीर जखमी

कोल्हापूर। पुणे- बंगऴूर महामार्गावरील किणी टोलनाक्यावर पोलिस आणि गुंडांमध्ये चकमक उडाली. या चकमकीत एकजण गंभीर जखमी झाला असून त्याच्या पायाला गोळी लागली आहे. राजस्थानातील गुंडांच्या टोळीसोबत कोल्हापूर पोलिसांची ही चकमक उडाली आहे. 

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, मंगऴवारी रात्री साडेआठच्या सुमारास गुंड आणि पोलिसांमध्ये चकमक उडाली. यात एक गुंड गंभीर जखमी झाला आहे. त्याचबरोबर यात एक पोलिस कर्मचारीही जखमी झाले आहेत. शामलाल आणि श्रावणकुमार अशी जखमी गुंडांची नावे आहेत. यातील शामलाल हा टोळीचा प्रमुख आहे. या टोळीवर राजस्थानात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. 

कोल्हापूर पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार हे गुंड पांढऱ्या कारमधून येत असल्याचे समजले होते. माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी उजळाईवाडी टोलनाक्यापासून या गुंडाचा पाठलाग सुरू केला होता. किणी टोलनाक्याजवळ येताच पोलिसांनी या गुंडाच्या कारला वेढा दिला. पोलिसांची चाहूल लागताच यातील शामलालने पोलिसांच्या दिशेने बेछूट गोळीबार सुरू केला, यावेळी जिवाची बाजी लावत प्रत्युतरादाखल पोलिसांनी गोळीबार केला यात दोघा गुंडांच्या पायाला गोळी लागून ते खाली कोसळले. अनेक वर्ष जोधपूर – राजस्थान पोलिसांना चकवा देणाऱ्या या गुंडांच्या अखेर कोल्हापूर पोलिसांनी मुसक्या आवळत त्यांना ताब्यात घेतले.

दरम्यान या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलिस अधिक्षक अभिनव देशमुख आणि पोलिस अधिकारी घटनास्थऴी दाखल झाले होते. या ठिकाणी बघ्यानी मोठी गर्दी केल्याने महामार्गावरील वहातूक काही काळ ठप्प झाली होती. पोलिस निरिक्षक तानाजी सावंत, शिरोली पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक किरण भोसले, सहायक फौजदार रमेश ठाणेकर, स्थानिक गुन्हे शाखेचे हवालदार पांडूरंग पाटील, नामदेव यादव, रणजित कांबळे यांनी ही धाडसी कारवाई केली.

आरोपींची नावे
1) शामलाल गोवरधन वैष्णोई वय 22 रा. बीयासर, भैयासर, जोधपुर राजस्थान
2) श्रावणकुमार मनोहरलाल मान्जु वैष्णोई वय 24 रा. विष्णुनगर, बाखरी ता. आसीया जि.जोधपुर राजस्थान
3) श्रीराम पांचाराम वैष्णोई वय 23 रा.बटेलाई जोधपुर राजस्थान
मारुती डिझायर कार

Team Lokshahi News