तांदूळ धुतलेल्या पाण्याने चेहरा धुतल्यास त्वचा सुंदर आणि निरोगी होते? वाचून आश्चर्य वाटलं ना!!! हो हे अगदी, खरं आहे. त्वचा निरोगी ठेवण्यासाठी आपण या पाण्याचा वापर करू शकतो. कारण, त्वचेसाठी पोषक असलेल्या कित्येक घटकांचा या पाण्यामध्ये समावेश आहे. त्यामुळे तांदळाचे पाणी फेकण्याची चूक यापुढे अजिबात करू नका.
निसर्गोपचारामध्ये तांदळाच्या पाण्याचा वापर अत्यंत गुणकारी असल्याचे सांगितल्याने आपण आपल्या ब्युटी केअर रुटीनमध्ये याचा समावेश करू शकता. तांदळाचे पाणी हे एक नैसर्गिक मॉइश्चराइझर आणि टोनर आहे. या पाण्यातील पोषक घटक आपल्या चेहऱ्याचा रंग उजळण्यास मदत करतात. तसेच त्वचेवरील हायपर पिगमेंटेशन, काळे डाग किंवा सन टॅनिंग, चेहऱ्यावरील सुरकुत्या देखील यामुळे दूर होण्यास मदत मिळते. या पाण्याचा वापर दररोजच्या रुटीन मध्ये केल्यास त्वचा मऊ आणि कांतिमय होते आणि महत्त्वाचे म्हणजे या नैसर्गिक उपचाराचे त्वचेवर कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत.
तांदळाच्या पाण्यात आपली त्वचा पुनरुज्जीवित करण्यासाठी आणि नवीन पेशींच्या वाढीसाठी उत्तेजन देणारे घटक असतात. यात त्वचेतील कोलेजन वाढवणारे फेरुलिक अॅसिड नावाचे अँटी ऑक्सिडेंट आहे. यामुळे त्वचेचे धूळ, माती, प्रदूषण आणि सूर्याच्या हानिकारक किरणांपासूनही संरक्षण होते. तेलकट त्वचा असणाऱ्यांनी या पाण्याचा क्लिन्जर म्हणून वापर केल्यास आश्चर्यकारक बदल दिसून येतात.
दरम्यान कित्येक स्किन केअर प्रोडक्टमध्ये महत्त्वाची सामग्री म्हणून तांदळाच्या पाण्याचा वापर केला जातो. यापासून तयार करण्यात येणारे क्रीम, लोशन आणि मॉइश्चराइझर इत्यादी ब्युटी प्रॉडक्ट महागडे असतात. त्यामुळे खर्च टाळण्याासाठी आणि नैसर्गिक उपचार म्हणून तुम्ही घरच्या घरी देखील तांदळाचे पाणी मॉइश्चराइझर म्हणून वापरू शकता.
(प्रत्येक व्यक्तीच्या त्वचेचा पोत एकसारखा नसल्याने त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ला घेऊन तुम्ही या पाण्याचा वापर करू शकता)