Categories: शिक्षण/करिअर

अंतिम सत्रातील विद्यार्थ्यांच्या परिक्षेबाबत राज्यपालांचा मोठा निर्णय; ऑक्टोबरच्या ‘या’ आठवड्यात होणार परिक्षा

मुंबई | अंतिम सत्राच्या विद्यार्थ्यांना घरी बसून परीक्षा देण्याची मुभा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी दिली असल्याची माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज दिली आहे. लेखी परीक्षा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात घेऊन महिना अखेपर्यंत निकाल लावण्याचा प्रयत्न करण्यात येईल. राज्यपाल आणि कुलगुरुंसोबत झालेल्या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली आहे.  

याबाबत माहिती देताना सामंत म्हणाले की, “घरात बसून परीक्षा झाली पाहिजे यासाठी आमचा आग्रह होता. त्याला राज्यपालांनी मंजुरी दिली आहे. ऑनलाइन व ऑफलाइन परीक्षेसंबंधीचा अंतिम अहवाल आज रात्रीत तयार करून उद्या शासनास प्राप्त होईल. अहवाल मिळाल्यानंतर तातडीने विद्यापीठांकडे पाठवण्यात येईल. तसेच ३१ ऑक्टोबरपर्यंत राज्यातील सर्व निकाल लावू शकत असल्याची कुलगुरुंची भूमिका युजीसीकडे मांडण्यात येईल असे ही त्यांनी यावेळी सांगितले.

केंद्रावर न जाता प्रॅक्टिकल घ्यावे यासाठी प्रयत्नशील
अंतिम सत्राच्या प्रॅक्टिकल परीक्षा सोप्या पद्धतीने व केंद्रावर न जाता घेण्यात याव्यात यासंबंधीचा विचार प्रस्तावाधीन असून यासाठी अहवाल तयार करण्यात येत आहे. १५ ते ३० सप्टेंबर दरम्यान प्रॅक्टिकल परीक्षा घेण्याचे नियोजन असून परीक्षेच्या तारखा संबंधित ती ती विद्यापीठे निश्चित करणार आहेत. परंतु ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यातच लेखी परीक्षा घेण्याचा प्रयत्न करणार असल्याचे उदय सामंत यांनी सांगितले आहे.

Team Lokshahi News