नवी दिल्ली। दिल्ली विधानसभेचा निकाल जाहीर होण्याआधीच निकालांचा कल पाहून भाजपाने आपला पराभव स्विकारला असून पराभवामुळे आम्ही निराश होत नसल्याचे पोस्टर झळकावले आहे. दिल्लीतील सर्व ७० जागांचे कल हाती आले असून दिल्लीकरांनी तिसऱ्यांदा अरविंद केजरीवाल यांना साथ दिल्याचं चित्र आहे.
सध्याच्या आकडेवारीनुसार आम आदमी पक्ष जवळपास ५५ आणि भाजपा १५ जागांवर आघाडीवर आहे. दिल्ली पुन्हा एकदा काबीज करण्याचा ठाम विश्वास आपच्या कार्यकर्त्यांना असल्याने दिल्लीतील आपचे कार्यालय सजवण्यात आलं आहे. रंगबिरंगी फुगे आणि अरविंद केजरीवाल यांचे पोस्टर्स लावून कार्यकर्ते अंतिम निकालाच्या प्रतिक्षेत आहेत. तर, मतमोजणीला सुरूवात होईपर्यंत विजयाचा दावा करणाऱ्या भाजपाच्या दिल्लीतील कार्यालयात मात्र पराभव पत्करल्याचं पोस्टर लावण्यात आलं आहे.
दिल्ली भाजपा कार्यालयात लावलेल्या पोस्टरवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा फोटो दिसत आहे. यासोबतच पोस्टरवर, विजयामुळे आम्ही गर्विष्ठ होत नाही आणि पराभवामुळे आम्ही निराश होत नाही असा संदेश लिहिला आहे. मतमोजणीआधी भाजपाच्या नेत्यांकडून, दिल्लीमध्ये सरकार बनेल असा विश्वास व्यक्त केला जात होता. मनोज तिवारी यांनी भाजपाला ५५ जागा मिळतील असं म्हटलं होतं. पण मतमोजणीला सुरूवात होताच आपने स्पष्ट आघाडी घेतल्याचं समोर आल्यानंतर भाजपाकडून हे पोस्टर लावण्यात आलं आहे. यामुळे एकप्रकारे भाजपाने पराभव स्वीकारण्याची तयारी केल्याचं म्हटलं जात आहे.