Categories: Featured

म्हणून… भाजपचे खासदार राष्ट्रवादीच्या वाटेवर!

पुणे। लोकसभा आणि विधानसभेपूर्वी मोठ्या बढाया मारत मेगाभरती करून घेणाऱ्या भाजपला आता त्यांचीच माणसे सांभाळता येत नसल्याचे दिसू लागले आहे. सध्या पुणे जिल्ह्यातील भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. राष्ट्रवादीच्या जळगाव येथे होणाऱ्या कार्यकर्ता मेळाव्यात ते अधिकृतरित्या प्रवेश करणार असल्याचेही बोलले जात आहे. राष्ट्रवादीचे सर्वेससवा शरद पवार यांनीच आपल्याला निमंत्रण दिल्याचं संजय काकडे यांनी स्पष्ट केलं असून काकडे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना त्यामुळेच उधाण आलं आहे. 

महाराष्ट्रातून राज्यसभेच्या ७ जागांसाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत आपल्याला पुन्हा उमेदवारी मिळावी, अशी संजय काकडेंची अपेक्षा आहे. मात्र, काकडेंना उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी असून त्याऐवजीभाजपकडून राज्यसभेसाठी उदयनराजे भोसले यांना उमेदवारी दिली जाणार असल्याचे स्पष्ट आहे. त्यामुळे संतापलेल्या काकडे यांनी उदयनराजे यांच्या उमेदवारीवर गेल्या आठवड्यात आक्षेप घेतला होता. उदयनराजे यांचं भाजपसाठी काय योगदान आहे? अशा शब्दात त्यांनी टीका केली होती. मात्र, भाजप उदयनराजे यांच्या उमेदवारीवर ठाम असल्याचे स्पष्ट आहे. त्यामुळे सहाजिकच काकडेंचा पत्ता कट होणार असल्याने ते नाराज आहेत.

दरम्यान, संजय काकडे यांनी याअगोदर अनेकदा वादग्रस्त वक्तव्य करुन भाजपला अडचणीत आणलं आहे. त्यामुळे त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी आहे. याशिवाय काही महिन्यांपूर्नी संजय काकडे राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची माहिती समोर आली होती. त्यावेळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची मनधरणी केली होती. परंतु आता काकडेंची खासदारकीच धोक्यात आल्याने ते पर्यायी मार्गाचा विचार करूनच राष्ट्रवादीत जाणार असल्याचे बोलेले जात आहे. सहाजिकच काकडेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाने भाजपचं मोठं नुकसान होणार आहे.

Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: sanjay kakade