Categories: राजकीय

भाजपची राज्यसभेची उमेदवार यादी जाहीर, महाराष्ट्रातील दोन नावांवर शिक्कामोर्तब

नवी दिल्ली। भाजपने राज्यसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. महाराष्ट्रातून उदयनराजे भोसले आणि रामदास आठवले यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर मध्य प्रदेशच्या कोट्यातून नुकतेच काँग्रेसमधून भाजपमध्ये सामील झालेल्या ज्योतिरादित्य शिंदेंना राज्यसभेची उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. यामुळे अनेक दिवसांपासून प्रलंबित उमेदवारीचा प्रश्न भाजपने निकाली काढला आहे.

उदयनराजे भोसले उद्या (१२मार्च) आपला राज्यसभेसाठीचा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. महाराष्ट्राच्या कोट्यातून राज्यसभेवर निवडून गेलेल्या ७ खासदारांचा कार्यकाळ एप्रिल महिन्यात संपत आहे. त्यामुळे एप्रिल महिन्यातच राज्यसभेच्या या ७ जागांसाठी निवडणूक होणार आहे. त्यामुळे भाजपकडून कुणाला उमेदवारी मिळणार याविषयी अनेक नावांची चर्चा होती. यात भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे, रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले, माजी खासदार उदयनराजे भोसले या तिघांची चर्चा होती. मात्र, उमेदवारांच्या घोषणेनंतर एकनाथ खडसे यांना स्थान मिळाले नसल्याचं दिसत आहे.

राज्यसभेसाठी महाविकासआघाडीला ४ जागा मिळणार आहे. तर राष्ट्रवादीच्या वाटेला २ जागा मिळणार आहे. या दोन्ही जागांपैकी एका जागेवर राष्ट्रवादीकडून शरद पवार यांचे नाव निश्चित करण्यात आले होते. त्यानंतर दुसऱ्या जागेसाठी फौजिया खान यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.

राज्यसभा नियुक्तीसाठी निकष काय?

राज्यसभेवर निवडून जाण्यासाठी उमेदवाराला पहिल्या पसंतीची ३७ मतं आवश्यक आहेत. त्यामुळे आघाडीचे चार तर भाजपचे दोन उमेदवार सहज निवडून येतील. शिल्लक राहिलेल्या मतांमधून आणखी एक उमेदवार निवडून आणण्याचा आघाडीचा आणि भाजपचा प्रयत्न राहणार आहे.

Team Lokshahi News