कोल्हापूर | महाराष्ट्रातील सत्ता गेल्यामुळेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील मानसिक संतुलन ढासळल्यासारखे वक्तव्य करीत आहेत, अशी घणाघाती टीका ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली. त्यामुळेच चंद्रकांत पाटील हे डोक्यावर परिणाम झाल्यासारखे खुळ्यासारखे बडबडत असल्याचा उपहासात्मक टोलाही मुश्रीफ यांनी लगावला. चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेचा मुश्रीफ यांनी आजरा येथे झालेल्या पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या प्रचार मेळाव्यात खरपूस समाचार घेतला.
मंत्री मुश्रीफ पुढे म्हणाले, बहुजनांचे नेतृत्व म्हणून शरद पवार यांनी नवा महाराष्ट्र घडविला. दहा ते बारा लोकसभेच्या व दहा ते बारा विधानसभेच्या निवडणुका जिंकल्या. देशाचे कृषी मंत्री, संरक्षण मंत्री या पदांसह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी दिलेले योगदान निश्चितच मोठे आहे. राज्यात आणि केंद्रातही विरोधी पक्ष नेता म्हणून त्यांनी काम केले. तसेच ते एकदाही पराभूत झालेले नाहीत. तरी देखील चंद्रकांत पाटील यांचे वक्तव्य म्हणजे खुळ्याचीच बडबड असल्याचे मुश्रीफ म्हणाले. चंद्रकांत पाटील यांनी काहीही न करता एकदा नव्हे दोनदा मोठी संधी मिळाली होती. इतके ते भाग्यवान आहेत. परंतु या सगळ्याचा राज्याला तर सोडाच कोल्हापूर जिल्ह्यालासुद्धा काडीचाही उपयोग झाला नसल्याचाही टोलाही मुश्रीफ यांनी पाटील यांना लगावला.
गेले काही दिवस चंद्रकांत पाटील सातत्याने शरद पवार यांच्यावर टीका करताना दिसत आहेत. यावेळी तर त्यांनी कमाल करत थेट ‘शरद पवार अभ्यास नसलेले छोटे नेते’ असल्याचे विधान करून राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली. त्यांच्या या वक्तव्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या गोठात चांगलीच खळबळ माजली असून कार्यकर्त्यांमधून संतापाची भावना दिसून येत आहे.