Categories: कृषी

जोरदार विरोधानंतरही २ कृषी विधेयक संमत करण्यात सत्ताधाऱ्यांना यश

नवी दिल्ली | काँग्रेस, तृणमूल, आप खासदारांच्या तीव्र विरोधानंतरही गोंधळाच्या वातावरणात राज्यसभेत कृषीविषयक दोन विधेयकं मंजूर करण्यात सत्ताधारी पक्षाला यश आले आहे. आवाजी मतदानाने कृषी उत्पादन व्यापार आणि वाणिज्य विधेयक, तसेच हमीभाव आणि कृषीसेवा विधेयक संमत झाली. यानंतर राज्यसभेच्या कामकाजाला सोमवारपर्यंत स्थगिती देण्यात आली.

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या सातव्या दिवशी सरकारने राज्यसभेत शेतीशी संबंधित तीन विधेयके सादर केली. यावेळी विधयेकासंबंधित प्रश्नांना उत्तरे देताना कृषिमंत्री तोमर म्हणाले कि, ‘एक देश एक बाजार समिती’ या संकल्पनेला प्रोत्साहन देणं हा या विधेयकांमागचा मूळ उद्देश आहे. यामुळे शेतकऱ्यांना बाजार समितीच्या बाहेरही संधी उपलब्ध होईल, शेतकऱ्यांना आपल्या मालाची विक्री देशभरात कुठेही करता येईल असा दावाही त्यांनी केला.

विरोधकांचा वेलमध्ये गोंधळ –
विधेयकाला तीव्र विरोध करताना तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओ’ब्रायन यांनी उपसभापतींसमोरील नियम पुस्तिका फाडली. काँग्रेस आणि ‘आप’चे खासदार सदनातील वेलमध्ये उतरले. एवढेच नव्हे तर खासदारांनी सीटसमोर असलेले माइकही तोडले. चर्चेदरम्यान काँग्रेसने हे विधेयक म्हणजे शेतकर्‍यांच्या मृत्यूपत्रावर सही करण्यासारखा प्रकार आहे. या अध्यादेशामुळे कृषी उत्पन्न बाजार समित्यांचं अस्तित्व संपुष्टात येईल. तसंच यामुळे खासगी उद्योगपतींचा मनमानीपणा वाढेल अशी भीती ही विरोधी पक्षातील काही सदस्यांनी व्यक्त केली.

विधेयक पास झाल्यानंतर केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी विजयी चिन्ह दाखवत विधेयकाचे समर्थन केले. 

हरियाणा: अंबाला येथील सदोपूर सीमेवर कृषिविधेयकावरून आंदोलन करणार्‍या युवा कॉंग्रेस कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी पाण्याच्या फवाऱ्याचा वापर करत आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला.

Team Lokshahi News