Categories: कृषी

आपल्या परिसरातील ‘या’ वनस्पतीमुळे होतो जनावरांचा मृत्यू, जाणून घ्या सविस्तर माहिती

कोल्हापूर। आपल्या परिसरात आढळणाऱ्या अनेक वनस्पती ह्या औषधी गुणांनी संपन्न असतात. परंतु यातील काही वनस्पती विषारीदेखील असल्याचे दिसून येते. अशीच एक वनस्पती आपल्या परिसरात सर्रास आढळून येते. आणि या वनस्पतीमुळे आपल्या जनावरांचा मृत्युही होतो. ‘जोंकमारी’ असे या वनस्पतीचे नाव असून  ही वनस्पती खाल्यास जनावरांचा मृत्यू होतो. औरंगाबादमध्ये अशी घटना समोर आली असून ही वनस्पती कोल्हापूर, सांगलीसह पश्‍चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात आढळते.  ही वनस्पती जनावरांसाठी धोकादायक असल्याने जनावरे ही वनस्पती खाणार नाहीत याची काळजी प्रत्येक पशुपालकांनी घ्यावी, असे आवाहन निसर्गमित्र संस्थेचे अध्यक्ष डॉ. मधुकर बाचूळकर यांनी केले आहे. तसे पत्रक त्यांनी प्रसिद्धीस दिले आहे.

डॉ. बाचूळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, जोंकमारी ही वनस्पती अपवाद वगळता सर्व जिल्ह्यांत आढळते. ही एक वर्षायु रोपवर्गीय वनस्पती असून तिची उंची १२ ते ४० सेंटीमीटर इतकी असते. फांद्या चौकणी व गुळगुळीत असतात, तर पाने साधी देठरहित अंडाकृती असतात. या झाडाला निळ्या रंगाची फुले येतात. फुलांचा तळभाग तांबूस असतो. फळे लहान वाटाण्याएवढी असतात. गोलाकार व त्रिकोणी आकाराच्या बिया खरखरीत असतात.

या वनस्पतीत असणाऱ्या “सायक्‍लेमिन” या द्रव्यामुळे विषबाधा होते. जनावरे, पक्षी व कोंबड्यांसाठीही हे द्रव्य हानिकारक असते. या वनस्पतीत असणाऱ्या विशिष्ट प्रकारच्या तेलाला उग्र वास असतो. या वासामुळे दीर्घकाळची डोकेदुखी सुरू होते. कीटकनाशक म्हणून या वनस्पतीचा वापर केला जातो. तसं पहायला गेलं तरं ही वनस्पती जनावरं देखील खात नाहीत; मात्र बऱ्याचदा जनावरांना चारा देताना त्यात मिसळून ही वनस्पती जनावरांच्या पोटात गेल्यास जनावरांच्या जीवाला जीवाला धोका निर्माण होतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी जनावरांना चारा देताना अशी वनस्पती चाऱ्यातून जनावरांच्या पोटात जाणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे. त्यासाठी जोंकमारीचे रंग-रूप, गुणधर्म समजून घेणे आवश्‍यक आहे, असेही या पत्रकात म्हटले आहे.

‘जोंकमारी’ वनस्पतीच्या विषबाधेची लक्षणे पहायला गेल्यास सर्वसाधारणपणे गुरांचे पोट गच्च होणे, पोटाची हालचाल प्रक्रिया मंदावणे, जनावर चारा खाणे आणि रवंथ करणे थांबवते, मलमूत्र विसर्जन थांबते, गुरांचा अशक्तपणा वाढतो, डोळ्यांची उघडझाप वाढते, शरीर थंड पडते. आणि ७ ते १० दिवसांत जनावरांचा मृत्यू होतो. अशा वेळी तातडीने वैद्यकीय तज्ज्ञांच्या साहाय्याने वेळीच उपचार करणे गरजेचे असल्याचेही डॉ. बाचूळकर यांनी पत्रकात म्हटले आहे.

उपचार

एक किलो चुना दहा लिटर पाण्यात मिसळून चांगले ढवळून दहा तास स्थिर ठेवलेली ही चुन्याची निवळी दिवसातून तीन वेळेस एक ते दीड लिटर या प्रमाणात पाजावी. गुळाची काकवी २५० ग्रॅम, रेचक (पॅरोलेक्स बोव्हीरीम)च्या गोळ्या द्याव्यात. तोंडातून व शिरेतून कॅल्शियमसह ‘ब’ जीवनसत्त्वाचे इंजेक्शनही दिले जाते.

जोंकमारी वनस्पतीचे जसे तोटे तसेच फायदेही

ही वनस्पती विषारी असल्याचे जसे तोटे आहेत, तसे काही फायदेही आहेत. यात कीटकनाशक गुणधर्म असल्याने मासे व जळवा मारण्यासाठी याचा उपयोग होतो. पिसाळलेल्या कुत्र्याच्या व कोल्ह्याच्या विषारात याच्या पानाचा रस ठरावीक प्रमाणात देतात अथवा दंशावर लेप करतात. अंगात रुतलेले काटे काढण्यास व व्रण भरून येण्यासदेखील या वनस्पतीचा लेप गुणकारी ठरतो.

Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: animal animal health insurance Animal insurance blue-scarlet pimpernel plant farm insurance health insurance जनावरांची काळजी जनावरांचे आरोग्य व्यवस्थापन जोंकमारी वनस्पती पशुसंवर्धन