भारतीय सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर गारूड करणारा अष्टपैलू अभिनेता इरफान खानने अखेर जगाचा निरोप घेतला. गेल्या अनेक दिवसांपासून त्याची जीवन-मृत्युशी सुरू असेलेली लढाई २९ एप्रिल २०२० रोजी संपुष्टात आली. वयाच्या अवघ्या ५४ व्या वर्षी जगाचा निरोप घ्यावा लागलेल्या या अभिनेत्याला सेंद्रीय शेतीची आवड होती. ही गोष्ट अनेकांना माहित नसली तरी हा हरहुन्नरी कलाकार आपल्या नाशिक येथील फार्महाऊसवर सेंद्रीय पध्दतीने शेती करायचा. त्याची ही सेंद्रीय शेतीची आवड अगदी लहानपणापासूनच होती. जयपूर मधील आपल्या गावीही त्याने त्यावेळी सेंद्रीय शेती केली होती.
इरफानला झालेला आजार हे देखील त्याच्या सेंद्रीय शेतीवरील वाढत्या प्रेमाला कारणीभूत असल्याचे दिसून येते. कारण इरफानच्यामते ”आता आपण खात असलेल्या भाजीपाल्यांवर, फळांवर रासायनिक खतांचा आणि रासायनिक औषधांचा वापर अधिक असल्याने या अन्नाला कोणत्याच प्रकारची चव नाही. त्यामुळे अनेक प्रकारचे आजार उद्भवतात. पण सेंद्रीय शेतीत पिकवलेली फळे आणि भाज्यां चवदार असतात. आरोग्याच्या दृष्टीने सकस असतात. सेंद्रीय शेतीत पिकवलेले अन्न, फळे मला लहानपणी खालेल्या फळांची चव आठवणीत आणून देतात’, असेही तो म्हणायचा. रासायनिक खतांचा आणि रासायनिक औषधांचा वापर करुन शेती करणं म्हणजे निसर्गाला फसवण्यासारखे असल्याचे मत इरफान व्यक्त करायचा. इरफान आपल्या शेतात आंबा, भेंडी, दुधी भोपळा, कारली, पालक, तसेच विविध प्रकारच्या भाज्यांचे पीक घेत असायचा.
सेंद्रीय शेती पद्धतीवर तो मोठ्या अभिमानाने बोलायचा. आपल्या शेतात उभे रहिल्यानंतर आपल्याला अभिमान वाटतो, असे तो म्हणायचा. सेंद्रीय पद्धतीने फळे आणि भाजीपाला पिकवण्यास त्याला आवडत. आपल्या फावल्या वेळेत तो सेंद्रीय पद्धतीने फळे आणि भाजीपाला पिकवण्यास प्राधान्य द्यायचा. इरफान नेहमी म्हणायचा ‘मी जे खातो ते माझ्या शरीराला अपायकारक आहे, त्यामुळे आपल्याकडे वेळ आहे तर आपण प्रत्येकाने आपले अन्न, भाजीपाला स्वतः सेंद्रीय पध्दतीने पिकवून खावा’.
इरफानने जबर इच्छाशक्तीच्या जोरावर कॅन्सरवर मात केली होती. सप्टेंबर २०१९ मध्ये तो भारतात परतला होता. त्याच्यावर लंडनमधील रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. ‘लाइफ इन अ मेट्रो’, ‘पानसिंग तोमर’, ‘द लंचबॉक्स’, ‘हैदर’, ‘गुंडे’, ‘पिकू’, ‘तलवार’, ‘हिंदी मीडियम’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्याने दमदार भूमिका साकारल्या होत्या. इरफानच्या निधनांवर सिनेसृष्टीसह राजकीय वर्तुळातील दिग्गजांनीही त्याला श्रध्दांजली वाहिली आहे. विविध क्षेत्रातून इरफान खानच्या निधनावर भावूक प्रतिक्रिया येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, कॉंग्रेस नेते राहुल गांधी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह दिग्गज नेत्यांनी इरफान खान यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.