Categories: Featured अर्थ/उद्योग

नव्या बजेट मध्ये आर्थिक उत्पन्नावरील टॅक्सचा स्लॅब याप्रमाणे राहण्याची शक्यता

नवी दिल्ली। संसदेत काही वेळात सादर होणाऱ्या बजेटमध्ये सर्वसामान्य नोकरदारांना आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. इन्कम टॅक्सच्या स्लॅबमध्ये बदल होण्याचे संकेत मिळत आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी काल लोकसभेत आर्थिक सर्व्हे २०२० मांडला. या बजेटमध्ये इन्कम टॅक्समधून कर्मचारी वर्गाला दिलासा दिला जाण्याची शक्यता आहे. 

निर्मला सीतारमन यांनी सादर केलेल्या आर्थिक सर्व्हेक्षणावरुन असा अंदाज वर्तवला जात आहे की, सरकार या बजेट मध्ये करदात्यांना मोठा दिलासा देऊ शकते. याशिवाय पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक करण्यासाठीही मोठी घोषणा केली जाऊ शकते.

“कॉर्पोरेट टॅक्समध्ये घट केल्यानंतर इन्कम टॅक्समध्येही घट करण्याची मागणी सातत्याने सुरु होती. आर्थिक क्षेत्रात मागणी आणि उपभोग वाढण्यासाठी इन्कम टॅक्समध्ये सूट मिळणे गरजेचे आहे. करदात्यांना सूट देऊन आर्थिक क्षेत्रातील मागणी वाढू शकते”, असं तज्ज्ञांनी यापूर्वी स्पष्ट केले होते. सध्या इन्कम टॅक्समध्ये तीन स्लॅब आहे. यामध्ये २.५ ते ५ लाख पर्यंतच्या उत्पन्नावर ५ टक्के आयकर लागतो. तर ५-१० लाख उत्पन्नावर २० टक्के टॅक्स द्यावा लागतो. तर १० लाखांच्या वर उत्पन्न असलेल्यांना ३० टक्के टॅक्स लावला जातो. येणाऱ्या बजेटमध्ये १० लाखांच्या उत्पन्नावर मोठी सूट मिळू शकते. दहा लाख उत्पन्न गटातील नोकरदारांसाठी १० टक्क्यांचा नवा स्लॅब येऊ शकतो, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

बजेटमध्ये २.५ ते ५ लाख वार्षिक उत्पन्नावर ५ टक्के टॅक्स लावला जात आहे. यामध्ये काही बदल केले जाणार नाहीत. ५ ते १० लाख वार्षिक उत्पन्नावर सध्या २० टक्के टॅक्स आहे. ज्यामध्ये घट करुन १० टक्के केला जाण्याची शक्यता आहे. यासाठी नव्या स्लॅबचा प्रस्ताव येऊ शकतो. म्हणजे तीन स्लॅबच्या जागी आता चार स्लॅब येण्याची चिन्हं आहेत. याबरोबर २.५ लाखपर्यंतचे उत्पन्न टॅक्स फ्री राहणार आहे.

सध्या १० लाखांच्यावरील उत्पन्नावर ३० टक्के टॅक्स लावला जातो. सूत्रांनुसार हा स्लॅबही मोडण्यात येणार आहे. तर १० ते १५ लाख उत्पन्नावर २० टक्के आणि १५ लाखांच्यावरील उत्पन्न असलेल्यांवर ३० टक्के टॅक्स लावला जाऊ शकतो. आणि  दोन कोटी रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न असलेल्यांवर ३५ टक्के टॅक्स आकारला जाण्याची शक्यता आहे.

नव्या बजेट मध्ये आर्थिक उत्पन्नावरील टॅक्सचा स्लॅब याप्रमाणे राहण्याची शक्यता
  • २.५ लाख उत्पन्न – टॅक्स फ्री
  • २.५ लाख ते ५ लाख उत्पन्न – ५ टक्के
  • ५ लाख ते १० लाख उत्पन्न – १० टक्के
  • १० ते १५ लाख उत्पन्न – २० टक्के
  • १५ ते २ कोटी उत्पन्न – ३० टक्के
  • २ कोटी पेक्षा अधिक उत्पन्न – ३५ टक्के
Lokshahi News

Share
Published by
Lokshahi News
Tags: Alleged Tax bank sector big income budget 2020 Economic Economic Survey 2020 Employee Evasion finance income income tax income tax deduction income tax slab Insurance sector loksabha mutual fund Nirmala Sitaraman PF PM Narendra Modi salary tax आर्थिक बजेट २०२० केंद्रीय बजेट २०२०