Categories: राजकीय

बुलडाणा जिल्हापरिषदेवरही ‘महाविकास आघाडी’ची सत्ता!

बुलडाणा।बुलडाणा जिल्हा परिषदेत अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध झाली असून अध्यक्षपदी काँग्रेसच्या मनीषा पवार तर उपाध्यक्षपदी शिवसेनेच्या कमलताई बुधवत यांची वर्णी लागली आहे.

बुलडाणा जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी महाविकासआघाडीतर्फे काँग्रेसच्या मनिषा पवार तर उपाध्यक्षपदासाठी शिवसेनेच्या कमलताई बुधवत यांचे अर्ज दाखल झाले होते. भाजपतर्फे अध्यक्ष पदासाठी रुपाली काळपांडे आणि उपाध्यक्षपदासाठी जयश्री विनोद टिकार असे दोन अर्ज दाखल झाले होते. मात्र भाजपच्या दोन्ही उमेदवारांनी त्यांचे अर्ज शेवटच्या क्षणी मागे घेतले.  

बुलडाणा जिल्हा परिषदेतची सदस्य संख्या ६० असून भाजपच्या एक सदस्याने राजीनामा दिल्याने ५९ सदस्य आहेत. यात काँग्रेस १४, राष्ट्रवादी ८, शिवसेना १०, भाजप २३, भारिप २ आणि अपक्ष २ असे संख्याबळ  आहे.

यंदा शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची महाविकासआघाडी असल्याने भाजपला सत्तेबाहेर राहावं लागलं आहे. यापूर्वी भाजपने राष्ट्रवादीशी आघाडी करुन सत्ता घेतली होती. मात्र आता महाविकासआघाडीने एकत्र जिल्हापरिषदेत सत्ता स्थापन केली आहे.

Team Lokshahi News