मुंबई | पुढील काही महिन्यांत मोठ्याप्रमाणात नोकरीच्या संधी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. याबाबत नुकताच एक अहवाल सादर करण्यात आला आहे. पुढील काळात सुमारे 63 टक्के कंपन्यांकडून कर्मचारी भरती करण्यात येणार असल्याचे या सर्वेक्षण अहवालात म्हटले आहे. 

देशावर दोन वर्ष कोरोना (Corona) संकट होते. कोरोना काळात लावण्यात आलेल्या लॉकडाऊनचा (Lockdown) मोठा फटका देशातील अनेक कंपन्यांना बसला. मात्र आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने सर्व निर्बंध हटवण्यात आले आहेत. निर्बंध हटवल्यानंतर आता कंपन्यांकडून देखील गेल्या दोन वर्षांत झालेले आपले नुकसान भरून काढण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. त्यामुळे पुढील काळात रोजगाराच्या अनेक संधी (Job opportunities) उपलब्ध होणार आहेत.

भारतात पुढील काही महिने जॉब मार्केट मजबूत स्थितीत राहण्याची शक्यता आहे. याबाबत Manpower Group’s employment scenario चा सर्वेक्षण अहवाल मंगळवारी जाहीर झाला. या सर्वेक्षण अहवालानुसार पुढील काही महिन्यांत देशातील जवळपास 63 टक्के कंपन्यांकडून कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. 2022 च्या जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत रोजगार भरतीचे प्रमाण हे गेल्या आठ वर्षांती सर्वोच्च स्थानावर असेल असा या अहवालाचा अंदाज आहे.

अहवाल काय सांगतो

सर्वेक्षणानुसार जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत जवळपास 63 टक्के कंपन्या या मोठ्याप्रमाणात कर्मचारी भरतीची प्रक्रिया राबवणार आहेत. तर बारा टक्के कंपन्यांकडून कर्मचारी कपातीची शक्यता आहे. 24 टक्के कंपन्या कर्मचारी धोरणात कोणताही बदल करणार नसल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मॅनपॉवर ग्रुप इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक संदीप गुलाटी यांनी याबाबत बोलताना म्हटले आहे की, आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. भारतातील कंपन्या अर्थव्यवस्थेच्या वाढीबाबत सकारात्मक आहेत. परिणामी उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी मोठ्या प्रमामात कर्मचारी भरती करण्यात येऊ शकते. कोरोना काळात उत्पादनाची मागणी घटल्याने कर्मचारी कपात करण्यात आली होती.