मुंबई।२४ डिसेंबर। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बैठकीनंतर मंत्रिमंडळ विस्तार येत्या महिन्याच्या अखेरीस पार पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. २३ – २४ तारखेला मंत्रीमंडळांच्या विस्ताराच्या बातम्या येत होत्या. मात्र त्याला आता ब्रेक लागला असून येत्या २७ किंवा ३० डिसेंबर रोजी मंत्रीमंडळ विस्तार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याचबरोबर उपमुख्यमंत्री पदी अजित पवार यांचेही नाव निश्चित असल्याचे मानले जात आहे.
सुरुवातीला २३-२४ डिसेंबरला मंत्रिमंडळ विस्तार होण्याची चर्चा होती. मात्र सरकारकडून अद्याप राज्यपालांची वेळच घेण्यात आलेली नाही. शिवाय २५ आणि २६ तारखेला अमावस्या आणि चंद्रग्रहण यामुळे मंत्रिमंडळ विस्तारासाठी मुहुर्त काढली जाण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे शुक्रवार २७ डिसेंबर किंवा ३० डिसेंबर मंत्री मंडळ विस्ताराचा मुहूर्त निघण्याची शक्यता आहे.
शिवसेना १३, राष्ट्रवादी १३ आणि काँग्रेस १० अशी उर्वरित मंत्रीपदाची यादी असून सध्या प्रत्येक पक्षांने २-२ मंत्र्यांचा शपथविधी उरकला आहे. नागपूर हिवाळी अधिवेशनादरम्यान, शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा झाली होती. दोन्ही पक्षांची विस्ताराची यादी तयार आहे. मात्र काँग्रेसकडून कोणाला मंत्रिपदं द्यायची यावरुन गल्ली पासून दिल्लीपर्यंत खलबतं सुरू आहेत. त्यामुळेच मंत्रीमंडळ विस्ताराला वेळ लागतं असल्याचेही बोलले जात आहे. काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते मंत्रिपदाबाबत चर्चेसाठी दिल्ली दरबारी गेले आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्रातील कॉंग्रेसची यंग ब्रिगेडही मंत्रीपदासाठी सरसावली असल्याचे समजत आहे.
काँग्रेसच्या वाट्याला महसूल, ऊर्जा आणि सार्वजनिक बांधकाम ही ३ महत्वाची खाती आहेत. त्यापैकी बाळासाहेब थोरातांकडे महसूल खातं देण्यात आलं. त्यामुळे दुय्यम खात्यांसाठी माजी मुख्यमंत्र्यांऐवजी नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची हायकमांडकडे मागणी करण्यात आली. त्यानुसार काँग्रेसची यादीही दिल्लीत फायनल झाल्याचं कळतंय. त्यामुळे मंत्रिपदी कोणाकोणाची वर्णी लागणार, याबाबत उत्सुकता आहे.
शिवसेनेकडील महत्त्वाची खाती – मुख्यमंत्री पदाबरोबर, गृह, नगरविकास, उद्योग, कृषी, क्रीडा आणि परिवहन, सार्वजनिक बांधकाम
राष्ट्रवादी कडील महत्त्वाची खाती – उपमुख्यमंत्री पदाबरोबर, अर्थ, गृहनिर्माण, राज्य उत्पादन शुल्क, आरोग्य, ग्रामविकास, सहकार आणि जलसंपदा
काँग्रेस कडील महत्त्वाची खाती – महसूल, ऊर्जा, शालेय शिक्षण, महिला बालकल्याण, सार्वजनिक बांधकाम, वैद्यकीय शिक्षण
मित्रपक्षांना कोणती पदे दिली जाणार की त्यांना केवळ महामंडळांवर संधी दिली जाणार हे देखील पाहणे महत्वाचे ठरणारं आहे.