कोल्हापूर | जिल्ह्यात सुरु करण्यात आलेल्या महसूल जत्रेत ज्या ज्या गावांमध्ये सध्या निवडणुका आहेत, ती गावे वगळून उर्वरीत गावांमधील पाणंद रस्ते वहिवाटीसाठी खुले करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे.
या मोहिमेंतर्गत राधानगरी तालुक्यातील हडकुळी पाणंद, भुदरगड तालुक्यातील नाझरे वसाहत दरम्यानचा ७०० मीटर पाणंद रस्ता आणि पन्हाळा तालुक्यातील कसबा कोडोली येथील सराफ रोड पाणंद रस्ता ऊस वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. सर्व ग्रामस्थांनी सामंजस्याने पाणंद व रस्ते खुले करण्यासाठी तलाठी व मंडळ अधिकारी यांच्याकडे संपर्क साधावा आणि या कामात सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज केले.
जिल्ह्यात महसूल जत्रा सुरु करण्यात आली आहे. या जत्रे अंतर्गत १२२५ गावातील अतिक्रमण काढून पाणंद रस्ता वहिवाटीस खुला करण्याचे उद्दिष्ट आहे. यानुसार गावांमधील पाणंद रस्ते ग्रामस्थांच्या सहकार्याने, सर्वसंमतीने आणि सामंजस्याने खुले करण्यात येत आहेत.
दुसऱ्या टप्यात १५ जानेवारीनंतर ऊर्वरीत गावांमधील अतिक्रमणे काढून पाणंद रस्ते खुले करण्यात येणार आहेत. ग्रामस्थांनी सामंजस्याने आणि सर्वसंमतीने पाणंद व रस्ते खुले करण्यासाठी तलाठी व मंडळ अधिकारी यांच्याकडे संपर्क साधावा आणि या कामात सहकार्य करावे, असे आवाहन करुन ग्रामस्थांनी केलेल्या सहकार्याबद्दल जिल्हाधिकारी देसाई यांनी त्यांचे आभारही मानले.