पंतप्रधान बेरोजगार भत्ता योजना २०२० अंतर्गत दरमहिना ३,५०० रुपये मिळवण्याच्या लालसेपोटी आपण सोशल मेसेजिंग अॅपवर व्हायरल होणाऱ्या लिंकवर क्लिक कराल तर कदाचित तुमचेच बँक खाते रिकामे होईल. त्यामुळे फुकटात खात्यात पैसे जमा होतील या हव्यासापोटी अशा कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका. अन्यथा स्वतःचेच खाते रिकामे करून घेण्याची वेळ आपल्यावर येईल.
पंतप्रधान बेरोजगारी भत्ता योजना २०२० अशी कोणतीही योजना केंद्र सरकारच्या वतीने चालवली जात नसून केवळ फसवणुकीच्या हेतूने अशा लिंक सोशल मिडीयावर व्हायरल केल्या जात आहेत. फसवणुक करणाऱ्यांना हे माहित आहे, की अनेक लोक हव्यासापोटी खातरजमा न करताच मेंढरासारखे एकामागोमाग एक लिंकवर क्लिक करतात, आणि हजारो लोकांना अशा प्रकारच्या लिंकही फॉरवर्ड करतात. या लिंकवर क्लिक केल्यास तुमच्या मोबाईल मधील महत्वाचा डाटा चोरी केला जातो. अथवा ईमेलसारख्या माध्यमातून तुमची महत्वाची माहिती चोरी होते. यामध्ये तुमचा आधार नंबर, पॅन नंबर, सोशल खात्यांचे पासवर्ड, मोबाइल फोनमध्ये असलेली महत्वाची माहिती, संकेतशब्द हे सर्व चोरी केले जाते. याचा वापर करून तुमच्या नावाने बोगस कर्जदेखील उचलले जाऊ शकते. अशी अनेक प्रकरणे उघडकीस देखील आलेली आहेत.
पंतप्रधान बेरोजगारी भत्ता योजना २०२० या स्किमबाबत सध्या सोशल मिडीयावर खूप मेसेज फॉरवर्ड होताना दिसत आहेत. तसेच अनेक लोकांना या स्किम बद्दल अधिक माहिती जाणून घेण्याचीही इच्छा दिसून आलीय. परंतु या स्किमबाबत सरकारी अधिकांऱ्याकडून माहिती घेतली असता अशा प्रकारची कोणतीही योजना सध्याच्या घडीला तरी केंद्रसरकारकडून राबवली जात नसल्याचे स्पष्ट झाले आहे.