कोल्हापूर | केंद्र शासनाच्या निर्देशानुसार राबवण्यात येणाऱ्या पोषण माह अभियानाअंतर्गत करवीर तालुक्यातील भुये बीट येथे ‘आम्ही कोल्हापूरी, पोषणात भारी’ हा उपक्रम साजरा करण्यात आला. यावेळी कुपोषित बालक गृहभेट, गरोदर स्तनदा माता यांना आहार व आरोग्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच ३ ते ६ वयोगटातील बालकांना अन्नप्राशन, पाक कृती, अॅनीमिया अशा विविध विषयावर रॅली काढून लोकांमध्ये जनजागृती करण्यात आली.
बदलती जीवनशैली, वातावरणातील बदल, पोषण आहाराबाबतीत अचूक माहितीचा अभाव यामुळे बालकांमध्ये कुपोषणाचे प्रमाण वाढत आहे. यामुळे अंगणवाडी स्तरावरील बालकांच्या आरोग्याचा प्रश्न ध्यानात घेऊन राज्य सरकारच्या महिला व बालकल्याण विभागाकडूनही या उपक्रमास प्रोत्साहन दिले जात असून विविध माध्यमातून सही पोषण देश रोषण करण्यावर भर दिला जात आहे.
हा उपक्रम भुये बीट अंतर्गत निगवे, शिये, भुये, भुयेवाडी, जठारवाडी, सादळे मादळे ह्या गावातील अंगणवाडी सेविका, मदतनीस ह्यांनी विविध कार्यक्रम घेत राबवला. यासाठी जिल्हा कार्यक्रम अधिकारी सोमनाथ रसाळ, बालविकास अधिकारी ज्योती पाटील, पर्यवेक्षिका नीलम पोवार यांचे मार्गदर्शन लाभले.